वाहनाच्या धडकेमुळे कमरेला बांधलेले चाकू पोटात घुसल्याने युवकाचा मृत्यू
By admin | Published: July 16, 2017 02:31 AM2017-07-16T02:31:09+5:302017-07-16T02:31:09+5:30
नवीन हायवेवरील घटना; जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे इसमाच्या कमरेला बांधलेले दोन धारदार चाकू पोटात घुसल्याने, युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी नवीन हायवे (हिंगणा शिवार) वर घडली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
नायगाव येथे राहणारा शेख चाँद शेख गुलाब (२0) याने दिलेल्या तक्रारीनुसार मतिनोद्दीन अलिमोद्दीन वय २३ (रा. आकोट फैल) हे एमएच ३0 आर ७८0३ क्रमांकाच्या मोटारसायकलने नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास जात होते. दरम्यान त्याने हिंगणा शिवारात मोटारसायकल रस्त्याला कडेला उभी केली. समोरून भरधाव येणार्या अज्ञात वाहनाला त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनचालकाने त्यांच्या अंगावर वाहन आणून त्यांना धडक दिली. मतिनोद्दीन यांच्या कमरेला यावेळी धारदार दोन चाकू बांधलेले होते. वाहनाने धडक दिल्यामुळे कमरेला बांधलेले दोन्ही चाकू त्याच्या पोटात घुसले आणि यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी नऊ इंच लांबीचे दोन धारदार चाकू जप्त केले आहेत. शेख चाँद याच्या तक्रारीनुसार जुने शहर पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३0४(अ) नुसार गुन्हा दाखल केला.
मृतकाने लुटमार करण्याच्या उद्देशानेच अडविले वाहन
वाहनाच्या धडकेमुळे कमरेला बांधलेले चाकू पोटात घुसून मतिमोद्दीन (२३) याचा मृत्यू झाला. जुने शहर पोलिसांच्या माहितीनुसार मतिमोद्दीन व त्याच्या सहकार्याने लुटमार करण्याच्या उद्देशानेच वाहन अडविण्याचा प्रयत्न केला; परंतु वाहनचालकाला संशय आल्याने, त्याने थेट त्याच्या अंगावरच वाहन घातले. सहकारी शेख चाँद हा बाजूला उभा असल्याने बचावला. मतिमोद्दीन याच्यावर बाळापूर येथे भादंवि कलम ३९२ गुन्हा दाखल आहे. लुटमार करण्याच्या हेतूने ते राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकलने फिरत होते, अशी माहिती जुने शहरचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी दिली.
घरून घेतले चाकू
मृतक मतिमोद्दीन व त्याचा सहकारी शेख चाँद हे मोटारसायकलने दुपारी सैलानी दर्गा येथे गेले. तेथून शुक्रवारी रात्री ११ वाजता दोघे निघाले. मध्यरात्री अकोल्यात आल्यावर ते नायगावला घरी आले. लुटमार करण्याच्या उद्देशाने दोघांनी घरातून दोन धारदार चाकू घेतले आणि राष्ट्रीय महामार्गावरील हिंगणा शिवारात आले.