युवकाचा मृत्यू ; नातेवाइकांकडून सिटी हॉस्पिटलची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:00 AM2021-01-14T11:00:31+5:302021-01-14T11:04:13+5:30
Akoal Hospital News २०वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना बुधवारी घडली.
अकोला : रामदासपेठस्थित सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान २०वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांच्या मध्यस्थितीने प्रकरण शांत करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी ऋषी लोणकर या २० वर्षीय युवकाच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्याला अकोल्यातील रामदासपेठ स्थित सीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या मते रुग्णाला ताप असून, त्याच्या हृदयाचे ठोकेही कमी होत होते तसेच त्याला किडनीचीही समस्या होती. रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्यावरही रुग्णाचा जीव वाचू शकला नाही, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे, तर रुग्णाच्या नातेवाइकांच्या मते रुग्णाच्या गंभीर अवस्थेबद्दल डॉक्टरांनी त्यांना कळविले नाही. रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील आयसीयूच्या काचांची तोडफोड करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्रय आव्हान पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी रुग्णाच्या नातेवाइकांसह रुग्णालय प्रशासनाची बाजू ऐकून घेतली व प्रकरण शांत करण्यात आले. पोलिसांत तक्रार न करताच हे प्रकरण आपसात मिटविण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेत रुग्णालयातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.