मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 10:44 AM2021-06-28T10:44:03+5:302021-06-28T10:44:37+5:30

Akola News : सहा महिन्यांत ११२ रस्ते अपघात झाले, यामध्ये ५२ व्यक्तींनी या अपघातांत आपला जीव गमावला.

Deaths in corona, as well as road accidents | मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्यू

मरण झाले स्वस्त; महामारीत कोरोनाने, तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्यू

Next

अकोला : काेरोना महामारीने जनजीवन ढवळून निघाले. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना प्राणसही मुकावे लागले. त्यात भरीस भर रस्त्यावर अपघातांतही अनेकांचा मृत्यू ओढवला आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास मरण स्वस्त झाले काय, असे वाटू लागले आहे.

गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे जीवही कोरोना महामारीने गेले. संचारबंदी, लॉकडाऊन असले तरी रस्त्यावरील रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी रस्ते अपघातांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मागील सहा महिन्यांत ११२ रस्ते अपघात झाले आहेत. यामध्ये ५२ व्यक्तींनी या अपघातांत आपला जीव गमावला. गतवर्षी म्हणजे जानेवारी ते मे २०२० या कालावधीत ५१ व्यक्तींनी जीव गमावला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १०३ व्यक्तींपैकी अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे २१ व्यक्ती, डेंजर ड्रायव्हिंग ३९, दारू प्राशन केल्यामुळे १६, चुकीच्या साइडमध्ये वाहन चालविल्यामुळे १२ जण, तर अन्य कारणांमुळे १५ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. महामार्गावर रस्त्यांची उंची कमी-जास्त असणे, जोड रस्त्यांची उंची कमी असणे तसेच ॲप्रोचरोड व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हे सर्व अपघात घडले आहेत. याशिवाय वाहनाचा वेग मर्यादेपेक्षा जास्त ठेवणे, हेल्मेटचा वापर न करणे, नियमांचा भंग करणे यामुळेही अपघातांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

 

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र व राज्य सरकारने काहीकाळ संचारबंदीची घोषणा केली होती. त्यामुळे रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र लॉकडाऊन काळातही अपघातांची संख्या मोठी आहे. गत दीड वर्षात रस्ते अपघातांत १०३ जणांचा बळी गेला आहे. रस्त्यावर होणारे अपघात हा गंभीर विषय असून, अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्याचे समजते. असे असले तरी अपघात कमी झाले, असे म्हणता येणार नाही. लवकरच महामार्गाचे चाैपदरीकरण हाेणार असल्याने दिलासा मिळणार आहे.

 

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

अपघात वाहनांमध्ये होत असला तरी पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही या अपघातांचा धोका आहे. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनाही धोका असल्याचे समोर आले आहे.

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

रस्ते अपघातात अनेकदा नियमांचा भंग होत असल्याचे दिसून येते. यात नियमापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, मद्यप्राशन करणे, चुकीच्या साइडने वाहन चालविणे या बाबींचा समावेश असतो. ही चूक तरुणाई करीत असल्याचे दिसते.

 

वेळ माैल्यवान, पण जीवन अमूल्य

अपघातानंतर दिनचर्या बदलून गेली आहे. जीवन अमूल्य आहे, याची कल्पना मला आली आहे. आपल्यासोबत इतरांचेही आयुष्य आपण धोक्यात घालत असतो. त्यामुळे वाहन चालवताना सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

- मनोज काळे, अकोला

 

वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. दोन सेकंदांसाठी माझा जीव वाचला, नाहीतर मी आज या जगात नसतो. नशीब बलवत्तर होते म्हणूनच मी बचावलो. म्हणूनच नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे. जेणे करुन अपघात टाळता येईल.

- वैभव बडे

वर्ष

अपघात

जखमी

मृत्यू

२०१८

२१९

१२९

९०

 

२०१९

२७४

१७६

९८

 

२०२०

१६३

११५

५१

 

२०२१ मेपर्यंत

११२

५२

६०

Web Title: Deaths in corona, as well as road accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.