अनुदानाची रक्कम गोठवून कर्ज वसुलीची नोटिस
By admin | Published: June 2, 2017 01:44 AM2017-06-02T01:44:09+5:302017-06-02T01:44:09+5:30
खेट्री : येथील दिव्यांग घरकुल लाभार्थी शेख फयुम शेख बिस्मिल्ला यांच्या घरकुलाच्या अनुदानाची रक्कम सस्ती येथील स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी गोठून ठेवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री : येथील दिव्यांग घरकुल लाभार्थी शेख फयुम शेख बिस्मिल्ला यांच्या घरकुलाच्या अनुदानाची रक्कम सस्ती येथील स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी गोठून ठेवली. लाभार्थीला कर्जाची नोटिस पाठविल्याचा प्रकार ३० मे रोजी उघडकीस आला.
घरकुल अनुदानाची रक्कम गेल्या काही महिन्यांपूर्वी सस्ती स्टेट बँकेतील लाभार्थीच्या खात्यात जमा झाल्याची माहिती मिळताच लाभार्थी पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता, सदर अनुदानाची रक्कम पूर्वीच्या कर्जामध्ये जमा केल्याचे शाखा प्रमुख नीलेश दुबे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे पूर्वीच्या कर्जामध्ये रक्कम नक्कीच कमी झाली असेल; परंतु लाभार्थीच्या पूर्वीच्या कर्जामध्ये रक्कम काहीच कमी झाली नाही आणि जेवढे कर्ज होते, तेवढ्याच थकीत कर्जाची नोटिस त्यांना पाठविण्यात आली. याविषयी लाभार्थीने मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, बीडीओ, तहसीलदार व संबंधिताकडे तक्रार केली, तरी अद्यापही दखल घेतली नाही. याबाबत शाखा प्रमुख नीलेश दुबे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
नियमाची पायमल्ली
अनुदानाची रक्कम त्वरित लाभार्थीपर्यंत पोहोचवून देण्याचे शासनाचे आदेश व नियम आहे; परंतु शाखा प्रमुख नीलेश दुबे यांच्या हेकेखोरपणामुळे चार महिन्यांपासून लाभार्थीला अनुदानाची रक्कम देण्यात आली नाही. उलट कर्जाची नोटिस पाठवून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे.
दिव्यांग लाभार्थीच्या तक्रारीची त्वरित दखल घेतली आहे. अनुदानाची रक्कम कायद्यानुसार पूर्वीच्या अर्जामध्ये जमा करता येत नाही. लाभार्थीच्या अनुदानाची रक्कम पूर्वीच्या कर्जामध्ये जमा करू नये, असे शाखा प्रमुखांना सांगितले आहे. लाभार्थीने पूर्वीच्या कर्जामध्ये काहीना काही पैसे भरावे, असा शाखा प्रमुखांचा उद्देश होता.
- तुकाराम गायकवाड,
लिड जिल्हा मॅनेजर, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, अकोला.