कर्जमुक्ती योजना : आणखी ३२३० शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:45 AM2021-01-13T04:45:41+5:302021-01-13T04:45:41+5:30
अकोला: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात आणखी पात्र ३ हजार २३० शेतकऱ्यांच्या याद्या ४ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ...
अकोला: महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात आणखी पात्र ३ हजार २३० शेतकऱ्यांच्या याद्या ४ जानेवारी रोजी जिल्ह्यातील बॅंकांमध्ये प्रसिध्द करण्यात आल्या.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत २०१९ मध्ये जिल्हा प्रशासनामार्फत १ लाख १४ हजार ८५९ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या होत्या. त्यापैकी पात्र १ लाख १ हजार २९४ शेतकऱ्यांच्या याद्या गत ३१ जुलै अखेरपर्यंत प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील आणखी ३ हजार २३० लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या शासनामार्फत २ जानेवारी रोजी ऑनलाइन पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आल्या. संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ४ जानेवारी रोजी जिल्ह्यातील बॅंकांमध्ये प्रसिध्द करण्यात आल्या. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्येही शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहेत. आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
९८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात
६१४.५५ कोटींची रक्कम जमा!
कर्जमुक्ती योजनेंतर्गत २ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील पात्र १ लाख ४ हजार ५२४ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. त्यापैकी डिसेंबर अखेरपर्यंत ९८ हजार १७ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ६१४ कोटी ५५ लाख रुपये कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली, असे जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारेणिया यांनी सांगितले.
३,९२४ शेतकऱ्यांचे आधार
प्रमाणीकरण प्रलंबित!
कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ४ हजार ५२४ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ९ जानेवारीपर्यंत ३ हजार ९२४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम अद्याप प्रलंबित आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंकचे व्यवस्थापक आलोक तारेणिया व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहायक निबंधक एस.डब्ल्यू. खाडे यांनी केले आहे.