कर्जमाफीचा गाजावाजा; पीक कर्ज वाटपाचा बोजवारा
By admin | Published: July 4, 2017 02:48 AM2017-07-04T02:48:26+5:302017-07-04T02:48:26+5:30
जिल्ह्यात केवळ २६ टक्के कर्ज वाटप
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात १ हजार १४० कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असले, तरी १५ जूनपर्यंत केवळ ३१४ कोटी ९८ लाख रुपये (२६ टक्के ) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे शासनाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा गाजावाजा करण्यात येत असताना, दुसरीकडे पीक कर्ज वाटपाचा बोजवारा उडाला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार १४० कोटी ५५ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले. त्यानुसार गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला, खरीप पेरण्या सुरू झाल्या; मात्र पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत गत १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील ३९ हजार ३२७ शेतकऱ्यांना केवळ ३१४ कोटी ९८ लाख रुपये (२६.२३ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. उर्वरित ७४ टक्के पीक कर्जाचे वाटप अद्याप बाकी आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा शासनामार्फत करण्यात आली. यासंदर्भात गत २८ जून रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार गत १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. एकीकडे कर्जमाफीचा गाजावाजा सुरू असताना, दुसरीकडे खरीप पेरण्या सुरू झाल्या तरी; जिल्ह्यात केवळ २६.२३ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याने, खरीप पेरणीसाठी बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बँकांकडून असे करण्यात आले कर्ज वाटप!
गत १५ जूनपर्यंत जिल्ह्यात बँकांमार्फत ३९ हजार ३१२७ शेतकऱ्यांना ३१४ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत ३२ हजार ५१ शेतकऱ्यांना २९३ कोटी ६० लाख ७५ हजार रुपये, राष्ट्रीयीकृत बँकांकडून ४ हजार ३९१ शेतकऱ्यांना ४२ कोटी ८३ लाख रुपये, खासगी बँकांकडून ६७३ शेतकऱ्यांना ११ कोटी २८ लाख रुपये आणि ग्रामीण बँकेकडून २ हजार २१२ शेतकऱ्यांना २१ कोटी २७ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.
उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह!
खरीप पेरणीचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येते; मात्र खरीप पेरण्या सुरू झाल्या, तरी खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि त्या तुलनेत करण्यात आलेल्या कर्ज वाटपाचे अत्यल्प प्रमाण बघता, यावर्षी जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.