दोनपैकी एक विवाह पद्धत मान्य केल्याशिवाय समान नागरी कायद्याचे घोडे पुढे सरकणार नाही - प्रकाश आंबेडकर
By संतोष येलकर | Published: July 7, 2023 06:24 PM2023-07-07T18:24:48+5:302023-07-07T18:25:04+5:30
अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अकोला : आगामी लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता, केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात समान नागरी कायदा लागू करण्याचा मुद्दा काढून चर्चा सुरू केली, असा आरोप करीत, हिंदू समाजात दोन वेगवेगळ्या विवाह पद्धती असून, दोन्ही पध्दती जिव्हाळ्याच्या आहेत. त्यापैकी एक विवाह पद्धत जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यत केंद्र सरकारचे समान नागरी कायद्याचे घोडे पुढे सरकणार नाही, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच समान नागरी कायदा लागू करणार असल्याची घोषणा केली. त्यानुषंगाने राजकीय पक्षांनी आपले म्हणणे मांडण्याचे विधी आयोगाने सांगितले आहे. परंतु समान नागरी कायद्याचा मसुदाच (ड्राफ्ट) अद्याप तयार नाही. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने पहिल्यांदा समान नागरी कायद्याचा ‘ड्राफ्ट’ प्रसिद्ध केला पाहिजे, असे ते म्हणाले. समान नागरी कायदा लागू केल्यास एकाच पद्धतीने विवाह करावा लागणार आहे, असे सांगत, हिंदू समाजात सप्तपदी आणि आंतरपाट या दोन वेगवेगळ्या विवाह पद्धती असून, त्या जिव्हाळ्याच्या आहेत. त्यापैकी एका विवाह पध्दतीवर जोपर्यंत एकमत होत नाही, तोपर्यंत केंद्र सरकारच्या समान नागरी कायद्याचे घोडे पुढे सरकणार नाही, असे ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, गजानन गवई, विकास सदांशिव, पराग गवई, नितीन सपकाळ आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी ‘तो’ प्रस्ताव आम्हाला द्यावा
आगामी निवडणुकांमध्ये राज्यात महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला जो प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव त्यांनी आम्हाला द्यावा, त्या पद्धतीने आम्हीही प्रस्ताव देऊ, असेही अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.