जीपीएसची फेरनिविदा काढण्याचा निर्णय

By admin | Published: June 6, 2017 12:25 AM2017-06-06T00:25:23+5:302017-06-06T00:25:23+5:30

मनपा स्थायी समिती सभेत निर्देश; दोन नागरी आरोग्य केंद्रांच्या बांधकामाला मंजुरी

Decision to reverse the GPS | जीपीएसची फेरनिविदा काढण्याचा निर्णय

जीपीएसची फेरनिविदा काढण्याचा निर्णय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा जमा करणाऱ्या घंटागाड्यांवर ‘जीपीएस’ प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाच कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. कंपन्यांनी सादर केलेले दर व तांत्रिक बाबींसंदर्भात आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान करू शकले नसल्यामुळे जीपीएसची पुन्हा फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे निर्देश स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी प्रशासनाला दिले.
नागरिकांच्या घरातून, बाजारपेठ व दुकानांमधून निघणारा केरकचरा जमा करण्यासाठी मनपाने पहिल्या टप्प्यात ८१ व दुसऱ्या टप्प्यात ४४ अशा एकूण १२५ नवीन वाहनांची खरेदी केली. नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याची साठवणूक अपेक्षित असताना काही वाहनचालक शहराच्या कानाकोपऱ्यात तसेच खुली जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा फेकून मोकळे होत असल्याचे चित्र आहे.
वाहनचालकांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने घंटागाड्यांवर ‘जीपीएस’ प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला. निविदा प्रकाशित केली असता, मनपाकडे पाच कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये सर्वात कमी दराची निविदा श्री इन्फोटेक बुलडाणा यांची होती. नगरसेवक अजय शर्मा, राजेश मिश्रा, सुनील क्षीरसागर, अ‍ॅड. इक्बाल सिद्दिकी, मोहम्मद मुस्तफा यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले. उपायुक्त समाधान सोळंके यांनी नगरसेवकांचे समाधान क रण्याचा प्रयत्न केला. सभेला नगरसेविका सुमनताई गावंडे, योगिता पावसाळे, माधुरी बडोणे, सुजाता अहिर, पल्लवी मोरे, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, फैय्याज खान आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

काय म्हणाले नगरसेवक ?
प्रभागातील साफसफाईवर देखरेख ठेवण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांची नेमणूक केली आहे. तरीदेखील प्रभागात घाणीचे व कचऱ्याचे ढीग साचल्याचे मत नगरसेवक अजय शर्मा यांनी नोंदवले. वाहनाला किती लीटर इंधन लागते, हे तपासण्यासाठी जीपीएस प्रणाली कार्यान्वित करीत असाल तर त्यापूर्वी इंधनाची दैनंदिन डायरी तपासण्याची यंत्रणा सुरू करा, अन्यथा इंधनाची चोरी कोणतीही आधुनिक यंत्रणा रोखण्यास समर्थ नसल्याचे मत प्रभाग ८ चे नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी व्यक्त केले. शहरात घाणीची समस्या कायम आहे. त्यामुळे यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात आलेल्या जीपीएस प्रणालीचा नेमका निकाल काय, याची माहिती सभेत सादर करा. त्यानंतरच हा विषय मंजूर करण्याची मागणी सुमनताई गावंडे यांनी केली. जीपीएसमुळे घंटागाडी चालकांवर लक्ष राहत असेल तर ही प्रणाली कार्यान्वित करण्याची सूचना राजेश मिश्रा यांनी केली.

मनपा कर्मचाऱ्यांकडे बनावट पावत्या
दुकानदार, व्यावसायिकांकडे ‘डस्ट बीन’ नसल्याची सबब पुढे करून त्यांना दंड आकारणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांकडे बनावट पावत्या असल्याचे नगरसेवक अजय शर्मा यांनी सभागृहात सांगितले. बनावट पावत्या देऊन व्यावसायिकांजवळून पैसे उकळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली असता या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश सभापती बाळ टाले यांनी दिले. याप्रकरणी प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागरी आरोग्य केंद्रांचा मार्ग मोकळा
अकोट फैल परिसरातील मनपाच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलचे नव्याने बांधकाम करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली. यासोबतच हरिहरपेठ परिसरात नागरी आरोग्य केंद्राची इमारत उभारण्याला सभापती बाळ टाले यांनी मंजुरी दिली. दोन्ही ठिकाणच्या इमारतींचे बांधकाम करण्यासाठी मनपाने निविदा प्रक्रिया राबवली असता सर्वात कमी दराची निविदा सिंग कन्स्ट्रक्शनची प्राप्त झाली होती.

Web Title: Decision to reverse the GPS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.