शाळांचा निर्णय; शिक्षण विभागाचे कानावर हात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:12 AM2020-06-30T10:12:44+5:302020-06-30T10:12:50+5:30
शाळा समित्यांनी निर्णय घेण्यास सांगितले; परंतु शाळा सुरू करण्याविषयी सर्वच शाळांमधील समित्या इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.
- नितीन गव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १,३00 च्यावर पोहोचली आहे आणि मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. अशा स्थितीत शाळा सुरू करणे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून घातक ठरणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी कानावर हात ठेवत, शाळा समित्यांकडे बोट दाखविले असून, शाळा समित्यांनी निर्णय घेण्यास सांगितले; परंतु शाळा सुरू करण्याविषयी सर्वच शाळांमधील समित्या इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना विषाणूची स्थिती पाहून, शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचनासुद्धा दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शाळा सुरू करण्याबाबत माध्यमिक व प्राथमिक विभाग संभ्रमात आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शाळा समित्यांकडे सोपविला आहे; परंतु अनेक शाळांमधील समित्यांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आम्ही काय निर्णय घ्यावा, शाळा सुरू केली आणि विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न उपस्थित केला आहे. येत्या काळामध्ये शाळांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर शाळा समित्यांना किंवा संबंधित शाळा, मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल. शिक्षण विभागाने ही बाब ओळखूनच हा निर्णय शाळा समित्यांवर सोपविल्याचे दिसून येते. त्यामुळे कोणतीही शिक्षण संस्था सध्या तरी शाळा सुरू करण्याच्या बाबतीत तयार होत नाही. शिक्षण संस्थाचालकांसह विज्युक्टानेसुद्धा शाळा सुरू करण्यास विरोध दर्शविला आहे.
शिक्षण संस्थाचालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शिक्षण संस्था संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी दिलेल्या निवेदनात, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास शाळांना पालक व समाजाच्या रोष सहन करावा लागेल. स्थिती नियंत्रणात आल्यानंतरच शाळांचे निर्जंतुकीकरण करून शाळा सुरू करण्याचा विचार करावा.
विज्युक्टाचाही शाळा सुरू करण्यास विरोध
विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनने शिक्षण आयुक्तांना शनिवारी पाठविलेल्या निवेदनात शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास विरोध केला आहे. शिक्षकांना घरी काम देऊन तो कर्तव्यकाळ समजावा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, शाळांवर निर्णय ढकलणे चुकीचे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम दूर करण्याची मागणी विज्युक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांनी केली आहे.