व्यवस्थापन समिती घेणार शाळा सुरू करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:15 PM2020-06-22T12:15:08+5:302020-06-22T12:15:21+5:30
निर्णय मनपा आयुक्तांकडे सोपविण्यात आला असला तरीही या निर्णय प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समित्यांना सामील केल्या जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या शाळा येत्या २६ जून रोजी सुरू करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. यादरम्यान, शहरात रेड झोनमध्ये समाविष्ट होणाऱ्या शाळा सुरू करायच्या किंवा नाहीत, याचा निर्णय मनपा आयुक्तांकडे सोपविण्यात आला असला तरीही या निर्णय प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समित्यांना सामील केल्या जाणार आहे. त्यानुषंगाने २६ जून रोजी शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे आयोजन केल्या जाणार असल्याची माहिती आहे.
शहराच्या प्रत्येक कानाकोपºयात संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
सद्यस्थितीमध्ये बहुतांश भाग कंटेनमेन्ट झोन घोषित करण्यात आला असून, शहराचा रेड झोनमध्ये समावेश आहे. अशा स्थितीमध्ये येत्या २६ जूनपासून मनपाच्या शाळा सुरू करण्याच्या हालचाली होत आहेत. कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांना असल्यामुळे त्यांची काळजी घेण्याचे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच मनपा प्रशासनाकडून केले जात आहे.
अशा बिकट परिस्थितीमध्ये शहरातील महापालिकेच्या शाळा सुरू करण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाने मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सोपविला आहे. शहरातील कोरोना विषाणूची एकूणच परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरू करण्याच्या संदर्भात मनपा प्रशासन संभ्रमात आहे. कोरोना विषाणूची लागण लहान मुलांना होण्याची शक्यता लक्षात घेता येत्या २६ जून रोजी मनपा शाळेतील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीमधील सर्व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत.
प्रशासन, शाळा व्यवस्थापन समितीच्या जबाबदारीत वाढ
येत्या २६ जून रोजी पार पडणाºया बैठकीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर सविस्तर चर्चा होऊन योग्य निर्णय घेतल्या जाण्याची अपेक्षा आहे. कोरोनाचा फैलाव लक्षात घेता शाळा सुरू करण्याच्या संदर्भात मनपा प्रशासन तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या जबाबदारीत वाढ झाली असल्याने त्याकडे संपूर्ण लेकरांचे लक्ष लागले आहे.