युतीची घोषणा फोल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2016 03:20 AM2016-10-30T03:20:58+5:302016-10-30T03:20:58+5:30
दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे स्वतंत्र अर्ज; पाच नगराध्यक्ष पदांसाठी ७६ अर्ज.
अकोला, दि. २९-राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी युती जाहीर केली असली, तरी अकोला जिल्ह्यात होणार्या पाचही नगरपालिका निवडणुकीत मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. जिल्ह्यात पाच नगरपालिकांच्या नगराध्यक्ष पदांसाठी शेवटच्या दिवशी ७६ नामांकन अर्ज दाखल झाले आहेत, तर नगर सेवकपदासाठी ८२0 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.
अकोट, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर आणि पातूर नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी २९ ऑक्टोबर नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. राजकीय पक्षांनी अखेरपर्यंत युती,आघाडीचे प्रयत्न केल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. अनेक ठिकाणी दोन ते तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यातील एकाला पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली. भाजप आणि शिवसेना या पक्षाच्या नेत्यांनी राज्यात युती करण्याची घोषणा केली असली, तरी अकोला जिल्ह्यात मात्र ती फोल ठरली आहे. जिल्ह्यातील एकाही नगरपालिकेत या दोन पक्षांची युती झालेली नाही. अकोट नगरपालिकेत अध्यक्षपदासाठी शेवटच्या दिवशी २४ नामांकने दाखल झाली तर पातुरात ११, मूर्तिजापुरात १८, बाळापुरात १0 आणि तेल्हार्यात १३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यापैकी छाननी व नामांकन मागे घेण्याच्या मुदतीनंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.