तुरीच्या उत्पादनात घट; शेतकरी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:11+5:302021-01-14T04:16:11+5:30
पांढुर्णा : यंदा परतीचा पाऊस, ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ...
पांढुर्णा : यंदा परतीचा पाऊस, ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकरी ७० किलो ते १ क्विंटलच उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने तत्काळ दखल घेऊन पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात तुरीचे पेरणी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिसरातील चोंढी, चारमोळी, पिंपळडोळी शिवारात तूर सोंगणीला सुरुवात झाली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी तुरीची काढणी केली आहे. मात्र, उत्पादन घटल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदा तुरीचे एकरी ७० किलो ते १ क्विंटलच उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. तूर पिकापासून भरपूर उत्पादन मिळते. त्यामुळे तुरीचे पीक नगदी पिके म्हणून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होत असल्याने तुरीचे पीकही आता न परवडणारे झाले आहे. यंदा परतीचा पाऊस व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीला आलेली फुले झडून गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उत्पादनात घट झाल्याने खर्च निघत नसल्याने शेतकरी संकटात आहे. त्यामुळे शासनाने दखल घेऊन पीक विमा मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (फोटो)
---------------------------------
मूग, उडीद, सोयाबीनचे नुकसान झाल्याने तुरीवर आशा होती. मात्र, तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याने लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. खर्च परवडणारा नसल्याने काही शेतकऱ्यांनी सोंगणीच केली नसल्याचे चित्र आहे. याची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा.
- पंडीत देवकते, शेतकरी, पांढुर्णा