ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली; मात्र मृत्यूचे सत्र सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 11:17 AM2021-06-13T11:17:24+5:302021-06-13T11:17:30+5:30
Corona cases in Akola : मागील बारा दिवसांत जिल्ह्यातील ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अकोला : मागील बारा दिवसांत जिल्ह्यातील ४ हजार १५६ रुग्णांनी कोविडवर मात केली. शिवाय, नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय कमी झाले. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. अकोलेकरांसाठी ही बाब दिलासादायक असली, तरी मृत्यूचे सत्र सुरूच आहे. मागील बारा दिवसांत जिल्ह्यातील ४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्येचे प्रमाण कमी असले, तरी मृत्यूचा आकडा कायम आहे. हा आकडा चिंता वाढविणारा आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला. मागील बारा दिवसांत जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हिटी रेट ५.३७ टक्क्यांवर आला. रुग्णांच्या बाबतीत ही स्थिती सुधारली असून, बरे होणाऱ्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र मागील काही दिवसांत दिसून आले. मे महिन्याच्या अखेरीस उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या चार हजारांवर होती, ती बारा दिवसांत १ हजार ५७७ वर पोहोचली आहे. त्यामुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला; मात्र दुसरीकडे मृत्यूचे सत्र कायम आहे. मे महिन्याच्या तुलनेत बाधित रुग्णांचे प्रमाण घटले, तरी मृत्यूचा आकडा कायम आहे. जून महिन्यात आतापर्यंत ४२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. शिवाय, संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारादेखील आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाला हलक्यात न घेता नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करावे, असे आवाहन आराेग्य विभागातर्फे करण्यात आले.
महिना- रुग्ण - मृत्यू
जानेवारी - १,१३५ - १४
फेब्रुवारी - ४,५२७ - ३१
मार्च - ११,५५५ - ८६
एप्रिल - १२,४६० - २३६
मे - १५,३६१ - ३७६
जून - १,३५६ - ४२
त्रिसूत्रीचे पालन करा
कोविडची दुसरी लाट ओसरू लागली आहे; मात्र सोबतच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविडपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनापासून बचावासाठी नियमित मास्क लावा, हात धुवा आणि इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा या त्रिसूत्रीचे प्रत्येकाने पालन करण्याची गरज आहे.
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कुठलेही दुखणे अंगावर काढू नका. कोविडची लक्षणे असल्यास तत्काळ चाचणी करा. पालकांनी मुलांना जपावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला