महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी दीपक मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:29 AM2021-05-05T04:29:15+5:302021-05-05T04:29:15+5:30
अकोला : वाशिम येथील नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दीपक मोरे यांची अकोला महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली ...
अकोला : वाशिम येथील नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दीपक मोरे यांची अकोला महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश महापालिकेत सोमवारी धडकला.
महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखाधिकारी, एक उपायुक्त, सहाय्यक संचालक नगररचना, नगर रचनाकार, कर मूल्यांकन अधिकारी, कार्यकारी अभियंता बांधकाम, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग यासह इतर महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. ही सर्व महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे महापालिका आयुक्त निमा अरोरा अत्यंत काळजीपूर्वक प्रशासनाची विस्कटलेली घडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. मनपाच्या विविध विभागात असलेली खोगीरभरती आयुक्त यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळेच त्यांनी अशी खोगीरभरती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी कंत्राटी संगणक चालकांची परीक्षा घेऊन त्यातील ११ जणांची सेवा संपुष्टात आणली होती. त्यानंतर महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या परंतु पुन्हा कंत्राटी तत्वावर त्याच हुद्यांवर कामकाज करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांची सेवा बंद केली होती. अर्थात, एकीकडे प्रशासनाची घडी सुधारण्याचा प्रयत्न होत असला तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे दैनंदिन कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीमध्ये नगर विकास विभागाने सोमवारी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी दीपक मोरे यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.
दीपक मोरे यांच्या नियुक्तीकडे लक्ष
वाशिम नगरपरिषदेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेली दीपक मोरे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. दरम्यान, त्यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ते महापालिकेत कधी नियुक्त होतात याकडे लक्ष लागले आहे.