राजराजेश्वराला भक्तांचा जलाभिषेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:29 AM2017-08-22T00:29:28+5:302017-08-22T00:29:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यात १९४३ पासून सुरू झालेली कावड यात्रा हा लोकोत्सव झाला आहे. श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी शिवभक्त मंडळांकडून पूर्णेचे पाणी आणले जाते. देशात कुठेही न निघणारी कावड व पालखी यात्रा अकोलेकरांची एक आगळीवेगळी धार्मिक परंपरा असून, या वर्षी शिवभक्तांनी राजराजेश्वराला, तर भक्तांना वरुणराजाने जलाभिषेक करून, हा आनंदसोहळा द्विगुणित केला.
यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली व वातावरणात आनंद भरला. सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. गांधीग्राम येथून पूर्णेच्या पात्रातून जल आणून, त्याचा अभिषेक राजराजेश्वराला केला. यावेळी पावसानेही हजेरी लावत शिवभक्तांवर अभिषेक केल्याचे दृष्य होते. यंदाच्या पालखीमध्ये जुने शहरातून सर्वाधिक भरणे असलेली कावड डाबकी रोडवासी मित्र मंडळाची होती, यंदा ७७१ भरण्यांची कावड काढली. त्यापाठोपाठ हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळाची ७५१ भरणे, मानाचे स्थान असलेल्या हरिहर शिवभक्त मंडळाची ४०१ आणि सर्वाधिक चार हजार सदस्य असलेल्या जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाच्यावतीने १११ भरण्यांची कावड अकोलेकरांसाठी आकर्षण ठरली. कावडसोबतच शिभक्तांनी पालखीवर कल्पक आणि आकर्षक देखावे उभारले होते.
विविध शिवभक्त मंडळांनी साकारलेले पालखीवरील आकर्षक देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. महादेवाच्या विविध छटा शिवभक्त मंडळांनी साकारल्या होत्या. कावडयात्रा उत्सव हा अकोलेकरांसाठी एक पर्वणीच ठरली. या सोहळ्यानिमित्त व्यापारी, दुकानदार यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद करून उत्सवात सहभाग घेतला. नागरिकांनीही हा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गांधीग्राम ते अकोला १७ किमीचे अंतर पायी कापल्यानंतरही पालखीतील शिवभक्तांचा उत्साह जराही कमी झाला नाही.
शिवभक्तानी राजेश्वराला पाच प्रदक्षिणा घालून शिवभक्तांनी भक्तिभावाने जलाभिषेक केला. चिमुकल्या बालक, युवक, आबालवृद्ध सर्वच कावडयात्रेचे खांदेकरी होऊन उत्साहात सहभागी झाले. पालखी मार्गावरील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांच्यावतीने शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.