निवडणुकीच्या कामात दिरंगाई; दोन कोतवाल निलंबित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:22 PM2019-10-15T12:22:25+5:302019-10-15T12:22:42+5:30
म्हैसांग येथील कोतवाल तथागत गवई व लोणाग्रा येथील कोतवाल नितीन चंदन यांना निलंबित करण्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिला.
अकोला: विधानसभा निवडणुकीच्या कामात अक्षम्य दिरंगाई केल्याने अकोला तालुक्यातील म्हैसांग व लोणाग्रा येथील दोन कोतवालांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार तथा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे यांनी सोमवारी दिला.
विधानसभा निवडणुकीत अकोला तालुक्यातील म्हैसांग येथील कोतवाल तथागत गवई व लोणाग्रा येथील कोतवाल नितीन चंदन यांची अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकविषयक कामाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय मुद्रणालयातून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या छापील मतपत्रिका प्राप्त करून आणण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकात कोतवाल तथागत गवई व नितीन चंदन यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यासाठी वारंवार सूचना देऊनही छापील मतपत्रिका आणण्याच्या कामाकरिता दोन्ही कोतवाल उपस्थित झाले नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली; परंतु विहित मुदतीत नोटीसचे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले नाही. त्यानुषंगाने विधानसभा निवडणुकीच्या कामात अक्षम्य दिरंगाई केल्याने, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ अन्वये तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार म्हैसांग येथील कोतवाल तथागत गवई व लोणाग्रा येथील कोतवाल नितीन चंदन यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार तथा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे यांनी १४ आॅक्टोबर रोजी दिला.