अतिवृष्टी मदतीला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:16 AM2021-06-02T04:16:19+5:302021-06-02T04:16:19+5:30

व्याळा : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मूग, उडीद पिकांचे सर्वेक्षण होऊन ९ महिने उलटले तरी, तत्कालीन तलाठ्यांनी ...

Delay in overflow help | अतिवृष्टी मदतीला विलंब

अतिवृष्टी मदतीला विलंब

Next

व्याळा : खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मूग, उडीद पिकांचे सर्वेक्षण होऊन ९ महिने उलटले तरी, तत्कालीन तलाठ्यांनी केलेल्या घोळामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहावे लागले. पात्र लाभार्थींना अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

उमरा येथे पोलीस आपल्या दारी मोहिमेला प्रतिसाद

उमरा : अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘पोलीस आपल्या दारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. उमरा येथे २७ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता पोलीस आपल्या दारी या योजनेची माहिती बीट जमादार संजय बोरोडे, विजय साबळे, उमेश दुतोंडे यांनी गावकऱ्यांना दिली.

पिंपळडोळी येथील नदीवरील पूल धोकादायक

पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पिंपळडोळी येथे गावानजीक निर्गुणा नदीवर अस्तित्वात असलेला पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पुलावर कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावरून पांढुर्णासह चोंढी धरण, चारमोळी, घोटमाळ, सोनुना, अंधार सांगवीसह परिसरातील नागरिक याच पुलावरून वाहतूक करतात. पुलाच्या दोन्ही बाजूंनी कोणत्याही प्रकारचे कठडे नाहीत. त्यामुळे सादर पूल हा अपघाताला निमंत्रण देत आहे.

खिरपुरी येथील अतिक्रमण काढण्याची मागणी

खिरपुरी बु : येथील खांबदेव महाराज मंदिराजवळ गुरांसाठी पिण्याचे पाण्याचे हौद आहेत. या हौद परिसरातच काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे गुरांना पाणी पाजण्यासाठी नेताना, अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे केली आहे.

पाणीपट्टी भरण्याचे ग्रामस्थांना आवाहन

आगर : खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याचे बिल थकीत असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामस्थांनी थकीत पाणी कर तातडीने जमा करून सहकार्य करावे, असे आवाहन अभियंता चव्हाण यांनी केले आहे.

दधम येथे आरओ वॉटर टँकचे उद्घाटन

बाळापूर : दधम येथील जि.प. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जि.प. सदस्य वर्षा गजानन वझिरे यांच्या पुढाकारातून शाळेत आरओ वॉटर टँकचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच कुसुम जाधव, गजानन डाखुरे, पवन अग्रवाल, गोपाल वाकोडे, मंगेश पांडे उपस्थित होते.

गुड मॉर्निंग पथक कागदावरच

पिंजर : हगणदारीमुक्त गाव अभियान राबविण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली; परंतु हे पथक केवळ कागदावरच दिसत आहे. पिंजर परिसरात लोक उघड्यावर शौच करतात; परंतु त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. यामुळे रोगराई पसरत आहे.

महामार्गावरील खड्ड्यांमुळे ट्रक उलटला

कुरणखेड : राष्ट्रीय महामार्गावर पैलपाडा फाट्याजवळ खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटल्याची घटना रविवारी दुपारी घडली. माँ चंडिका आपत्कालीन पथकाचे रणजित घोगरे यांनी चालक व क्लीनरला ट्रकबाहेर काढले.

माकडांचा धुडगूस, ग्रामस्थ त्रस्त

वाडेगाव : वाडेगाव येथे माकडांनी उच्छाद मांडला असून, पाण्याच्या शोधात माकडे गावात येत आहेत. घरांवर उड्या मारून कवेलू फोडत आहेत. छतांचे नुकसान करीत आहेत. माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले. वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

आमदार निधीतून शेतरस्त्याच्या कामास प्रारंभ

वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील धनेगाव येथील शेतरस्त्याच्या आमदार निधीतून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला असून, शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. एकीकडे शेतरस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी बांधवांना शेती मशागतीची कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आठ वर्षांपासून शेतरस्त्याचे खडीकरण रखडले!

बाळापूर : शहरातील काळबाई शेतशिवारातील ८ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून ५ कि.मी.च्या शेतरस्त्यावर माती भराव टाकला होता; परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रस्त्याच्या खडीकरणाचे काम रखडले आहे. खडीकरण न झाल्याने पालकमंत्री बच्चू कडू, उपविभागीय अधिकारी डाॅ. रामेश्वर पुरी यांना सोमवारी निवेदन देऊन रखडलेले काम सुरू करण्याची मागणी केली.

कोरोनाचा अहवाल लवकर द्यावा

मूर्तिजापूर : कोरोनाच्या अहवालास विलंब न करता पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना पुरावा द्यावा, अशी मागणी मूर्तिजापूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष लखन अरोरा यांनी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली आहे. मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा अहवालास विलंब होत आहे.

Web Title: Delay in overflow help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.