स्वॅब नमुने घेण्यात दिरंगाई; अहवालही लवकर मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 04:46 PM2020-06-16T16:46:12+5:302020-06-16T16:46:37+5:30
अनेक संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात कमालीची दिरंगाई होत आहे.
अकोला : विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या अकोल्यात आरोग्य विभाग व प्रशासकीय स्तरावरून कोरोना संसर्ग तपासणी व उपचारात तत्परता अपेक्षित असताना, अनेक संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात कमालीची दिरंगाई होत आहे. तर दुसरीकडे स्वॅब घेतलेल्या संदिग्धांचे चाचणी अहवालही लवकर मिळत नसल्याने संदिग्धांना कोविड केअर सेंटरमध्ये राहावे लागत असल्याने या रुग्णांची त्यांच्या कुटुंबीयांची घालमेल होत आहे. जिल्हा प्रशासन व सर्वोपचार रुग्णालयाकडून या समस्येचे निराकारण होत नसल्याने चित्र आहे.
अकोल्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १०४१ झाला असून, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३३० आहे. मृतकांचाही आकडा ५३ झाला आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने संदिग्ध रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट असल्याचे दिसून येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संदिग्धांना सर्वोपचार रुग्णालय, कोविड केअर सेंटर व खासगी हॉटेलमध्ये ठेवले जात आहे. या ठिकाणी मुक्कामी असलेल्या संदिग्ध रुग्णांच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात कमालीची दिरंगाई होत आहे. दुसरीकडे स्वॅब नमुने घेतल्यानंतर २४ तासात अहवाल येणे अपेक्षित आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. संदिग्ध रुग्णांना या ठिकाणी क्वारंटीन केल्यानंतर पाच ते सहा दिवसांपर्यंत नमुनेच घेतले जात नाहीत. स्वॅब घेतल्यानंतरही तीन ते चार दिवस अहवाल मिळत नसल्याने संदिग्ध रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची घालमेल होत आहे.
पाच दिवसानंतर घेतले नमुने
सिंधी कॅम्पस्थित एका कुटुंबातातील दोघांसह अन्य काही संदिग्ध शहरातील एका हॉटेलमध्ये क्वारंटिन आहेत. पाच दिवस क्वारंटीन राहिल्यानंतर सोमवारी त्यांचे नमुने घेण्यात आले. दुसरीकडे गुलजारपुरा भागातील एक संदिग्ध रुग्ण शनिवारपासून सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्र. २१ मध्ये आहे. सदर रुग्णाचे नमुने त्याच दिवशी घेतल्या गेले; परंतु दोन दिवस उलटून गेल्यानंतरही या रुग्णाचा अहवाल मिळाला नाही.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी तसेच रुग्णांना तत्काळ उपचार मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन व सर्वोपचार रुग्णालयाकडून सर्वस्वी प्रयत्न केले जात आहेत. काही प्रकरणांमध्ये दिरंगाई होण्याची शक्यता नाकारताही येत नाही; मात्र स्वॅब नमुने हे पाच दिवसानंतरच घेतले जात आहेत. कोरोना चाचणीचा अहवाल योग्य प्राप्त व्हावा, यासाठी तसे केले जात आहे. संदिग्ध रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.
- नरेंद्र लोणकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अकोला