शिक्षकांच्या वेतनाला विलंब; बीईओंना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:18 PM2020-02-18T12:18:22+5:302020-02-18T12:18:37+5:30
शिक्षकांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सर्वच पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.
अकोला : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या वेतनासाठी शालार्थ प्रणालीमधील ठरलेली प्रक्रिया दरमहा २० तारखेपर्यंत पूर्ण होत नाही. त्यामुळे देयके कोषागारात सादर न झाल्याने वेतनाला विलंब होत आहे. यापुढे शिक्षकांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सर्वच पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.
दरमहा ५ तारखेला वेतन मिळावे, यासाठी शिक्षकांनी सातत्याने मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वासही दिले. विशेष म्हणजे, शिक्षकांचे वेतन दरमहा नियमित होण्यासाठी जुलै, आॅगस्ट २०१९ मध्ये लेखी तसेच बैठकांमध्येही निर्देश दिले होते. तरीही वेतन वेळेवर होण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ठरलेली प्रक्रिया पूर्ण करण्यास शाळा, पंचायत समिती स्तरावर कमालीचा विलंब केला जातो. त्यामुळे वेतन देयके कोषागार कार्यालयात सादर करण्यासही विलंब होतो. परिणामी, शिक्षकांचे वेतनही वेळेवर होत नाही. याबाबत पंचायत समिती स्तरावर संबंधित अधिकारी-कर्मचाºयांवर कारवाई करणे आवश्यक आहे; मात्र गटशिक्षणाधिकाºयांकडून तशी कोणतीही कारवाई केल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी नाराजीही व्यक्त केली आहे. शालार्थ प्रणालीतील प्रक्रियेनुसार ठरल्याप्रमाणे कार्यवाही न झाल्यास शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब होतो. यापुढे शाळा, पंचायत स्तरावरून शालार्थ प्रणालीबाबत हलगर्जी केल्यास, त्यामुळे शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब झाल्यास ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली जाईल. तसेच संबंधितांवर कारवाईही केली जाईल, असा इशारा ठग यांनी पत्रातून दिला आहे.
माध्यमिक शाळा शिक्षकांची समस्या
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा शिक्षकांच्या वेतनास सातत्याने विलंब केला जातो. त्यामुळे संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. त्यामध्ये अकोला शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक कन्या शाळा, आगरकर माध्यमिक शाळा, आगरकर उच्च माध्यमिक शाळा, माध्यमिक उर्दू शाळा, माध्यमिक शहर शाळा, माध्यमिक शाळा मूर्तिजापूर, माध्यमिक शाळा बाळापूर, माध्यमिक शाळा-उच्च माध्यमिक शाळा अकोट, माध्यमिक शाळा कान्हेरी गवळी, माध्यमिक शाळा अडगाव, माध्यमिक शाळा हिवरखेड, माध्यमिक शाळा माना या शाळांचा समावेश आहे.