दुपारी हटवले; सायंकाळी जैसे थे!
By admin | Published: January 7, 2016 02:30 AM2016-01-07T02:30:45+5:302016-01-07T02:30:45+5:30
जुना भाजीबाजारात अतिक्रमण निर्मूलन मोहीमेनंतर अतिक्रमकांनी पुन्हा मांडला ठिय्या.
अकोला: जैन मंदिर परिसरातील जुना भाजी बाजारात अतिक्रमकांच्या घुसखोरीमुळे सर्वसामान्य नागरिकांना धड पायी चालणेदेखील मुश्कील झाले आहे. बुधवारी महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि बाजार विभागाने या भागात संयुक्तिक कारवाई करून अतिक्रमकांना पिटाळून लावले. दुपारी कारवाई केल्यानंतर सायंकाळी याठिकाणी पुन्हा अतिक्रमकांनी ठिय्या मांडल्याचे चित्र समोर आले. शहराच्या मध्यवर्ती भागात बाजारपेठ एकवटल्याने या ठिकाणी विविध साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची सतत वर्दळ राहते. गांधी रोड, टिळक रोड, जैन मंदिर परिसरातील जुना भाजी बाजार, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज, काला चबुतरा भागात खरेदीसाठी येणार्या ग्राहकांना अतिक्रमणाच्या समस्येमुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. या प्रकाराची गंभीर दखल घेत, आयुक्तांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार बुधवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने जैन मंदिरालगतच्या जुना भाजी बाजारा तील अतिक्रमकांना पिटाळून लावले. रस्ता मोकळा केल्यानंतर दुपारी पथक निघून गेले. मात्र, सायंकाळी याठिकाणी पुन्हा अतिक्रमकांनी ठिय्या मांडला.