‘त्या’ महाविद्यालयात प्रशासक नियुक्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:52 AM2021-02-20T04:52:42+5:302021-02-20T04:52:42+5:30
पातूर : येथील महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालयात प्रशासक नियुक्त करण्याची मागणी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे ...
पातूर : येथील महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालयात प्रशासक नियुक्त करण्याची मागणी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राचार्य व अध्यक्ष यांना निवेदन दिले होते. तसेच २७ ऑगस्ट २०२० रोजी एकदिवसीय संप केला होता. याची दखल घेत सहसंचालकांनी ८ ऑक्टोबर २०२० ला प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी २१ ऑक्टोबर २०२० ला संस्थेचे प्राचार्य, अध्यक्षांना आदेश दिला होता. त्यामुळे काही मागण्या मान्य केल्या; मात्र काही मागण्या अपूर्ण राहाव्या, यासाठी अध्यक्षांनी प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून चौकशी समिती नियुक्त केली. त्यामुळे प्राध्यापकांची निश्चिती, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग व इतर मागण्या प्रलंबित आहेत. संस्थेचे अध्यक्ष दररोज महाविद्यालयात येऊन कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी करणे, महिला कर्मचाऱ्यांना एकट्यात बोलाविणे असे प्रकार सुरू आहेत. एका महिला प्राध्यापिकेची विनयभंगाची तक्रार अध्यक्षाविरुद्ध असून, त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे महाविद्यालयात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी ९ फेब्रुवारी २०२१ ला कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चौकशी समिती येऊन गेली आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रशासक नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर डॉ. सुवर्णा डाखोरे, डॉ. अस्मिता खांबरे, डॉ. सुमित चौधरी, डॉ. योगेश भोसले, डॉ. गजानन रोडे, मनोज राऊत, संजयकुमार बोराडे, अमोल सोळंके, प्रशांत पाटील, वीरेंद्रसिंग सोळंके, पंकज मडघे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.