शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:19 AM2021-07-31T04:19:48+5:302021-07-31T04:19:48+5:30

मूर्तिजापूर : गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदाही गत ...

Demand for assistance of Rs 50,000 per hectare to farmers | शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

Next

मूर्तिजापूर : गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदाही गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली आली असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

एसडीओंना दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील शेतकरी सतत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. या वर्षीही झालेल्या पावसामुळे नदी व नाल्याकाठची शेती पूर्णपणे खरडून गेली असून, काही शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे मूग, सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अरविंद कोकाटे यांनी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर शहर अध्यक्ष शरद हजबे, उपाध्यक्ष हरीभाऊ वानखडे, विवेक शिंदे, सचिन शिंदे, मुन्ना नाईकनवरे, संदीप चौढाळे, पत्रकार विलास नसले, गणेश म्हसाये, अमोल ढोक, नगरसेवक सचिन देशमुख, राजेंद्र काळे, गणेश मोरे, सुनील ढवळे, गजानन मोरे, आशिष कोकाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------------------------

...अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी देणार लढा!

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकेच्या कर्जाचे ओझे, पाल्यांच्या शि‌क्षणाची जबाबदारी अशा प्रकारची अनेक संकटे उभी आहेत. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून, हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Web Title: Demand for assistance of Rs 50,000 per hectare to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.