मुख्यालयी राहत नसलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांचा मागविला लेखाजोखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:14 AM2021-06-28T04:14:36+5:302021-06-28T04:14:36+5:30
संतोष येलकर... अकोला: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत मुख्यालयी राहत नसलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांचा लेखाजोखा मागविण्यात आला असून, याबाबतची माहिती ...
संतोष येलकर... अकोला: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत मुख्यालयी राहत नसलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांचा लेखाजोखा मागविण्यात आला असून, याबाबतची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना (बीईओ) २१ जून रोजीच्या पत्राद्वारे दिले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी अनेक शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. तसेच यासंदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला विचारणाही केली जाते. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सातही पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी मुख्यालयी राहत असलेल्या आणि मुख्यालयी राहत नसलेल्या सहायक शिक्षक, विषय शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक इत्यादी संवर्गातील शिक्षकांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना २१ जून रोजीच्या पत्राद्वारे दिले. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी मुख्यालयी राहणाऱ्या आणि मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा लेखाजोखा लवकरच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे उपलब्ध होणार आहे.
शिक्षण समितीच्या सभेत
केली होती विचारणा!
जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याच्या मुद्यावर १८ जून रोजी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत समितीच्या सदस्य आम्रपाली खंडारे यांनी विचारणा करीत, मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांची माहिती समितीच्या पुढील सभेत सादर करण्याची मागणी केली होती. त्यानुषंगाने मुख्यालयी राहणाऱ्या आणि मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जि.प.
प्राथमिक शाळा
९०१
प्राथमिक शाळांमध्ये
कार्यरत शिक्षक
३,२५१