अश्लील चित्रपटांचे फलक लावण्यास बंदीची मागणी
By admin | Published: August 9, 2014 10:06 PM2014-08-09T22:06:56+5:302014-08-09T22:42:33+5:30
विद्यार्थी, युवक आक्रमक : जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
वाशिम : शहरात ठिकठिकाणी अश्लील चित्रपटांचे फलक लावण्यात येत असल्यामुळे विद्यालयीन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरूणपीढीवर विपरित परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेता शहरात अश्लील चित्रपटांचे फलक लावण्यास बंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात विद्यार्थी आणि युवकांच्यावतीने मानवाधिकार संरक्षण संस्था, वाशिम यांच्याकडून ७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. काळानुसार तरूण पीढीचे आचार विचार बदलत आहेत. त्यातच प्रगत तंत्रज्ञानामुळे परंपरागत चालीरिती आणि संस्कृतीचे हनन होत आहे. बदलत्या चालीरितींचा विपरित परिणाम तरूणपीढींवर होत आहे. त्यामुळे बलात्कार, विनयभंग् आदि गुन्हय़ांचे प्रमाण वाढत आहे. त्यातच अलिकडच्या काळात सर्रासपणे प्रदर्शित करण्यात येणार्या अश्लील चित्रपटांचीही तरूण पीढीवर वाईट परिणाम होण्यास महत्त्वाची भूमिका आहे. काही व्यावसायिक चित्रपटातील अंगप्रदर्शनही तरूणपीढीला बिघडविण्यात कारणीभूत आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात येत असलेल्या अश्लील चित्रपटांच्या फलकांमुळेही तरूणांचे विचार वाईटमार्गाने जात आहेत. त्यामुळे ते वाईटमार्गांचा अवलंब करून आपले चारित्र्य बिघडवित आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन शहरात अश्लील चित्रपटांचे फलक लावण्याची बंदी घालावी, असे जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मानवाधिकार संरक्षण संस्था, वाशिमचे सचिव रामेश्वर बाजड यांच्यासह शहरातील अनेक युवक, विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित होते.