चिपी येथील लघुपाटबंधारा बांधण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:15 AM2020-12-26T04:15:35+5:302020-12-26T04:15:35+5:30
तेल्हारा: तालुक्यातील आदिवासी ग्राम चिपी येथे लघुपाटबंधारा बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादीचे रामप्रभू तराळे यांनी ...
तेल्हारा: तालुक्यातील आदिवासी ग्राम चिपी येथे लघुपाटबंधारा बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देऊन आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादीचे रामप्रभू तराळे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
अकोट उपविभागातील सातपुडा पर्वतरांगेत पाण्याचे भरपूर स्रोत आहे; परंतु या भागात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम योग्य पद्धतीने राबविण्यात येत नसल्याने हजारो गॅलन पावसाचे पाणी व्यर्थ जात आहे. या भागातील एकूण ५२ नदी, नाल्यांवर बंधारे बांधण्यात यावे, तसेच चिपी येथे लघुपाटबंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. चिपी बंधाऱ्याचा फायदा अकोट मतदारसंघातील जवळपास ५० गावांना होणार आहे. या अनुषंगाने याभागात सर्वेक्षण व अंदाजपत्रक झाले असून, या योजनेत पुढे कोणतेही ठोस उपाययोजना झाली नाही. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला; मात्र याची दखल घेतल्या गेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामप्रभू तराळे यांनी ही बाब लक्षात घेऊन मुंबई येथे मंत्रालयात जाऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. चिपी येथे पाटबांधारा बांधण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. अकोला जिल्हा १९९४ पासून अनुशेष निर्देशांक अहवालानुसार सिंचनासाठी कायम अनुशेष या प्रकरणात येतो. लघुपाटबंधारे विभागाकडून होणारा हा बंधारा धरणाप्रमाणे असून, यामध्ये कोणत्याही प्रकारचे महसुली नुकसान, पुनर्वसन नसल्याने शेतकरी हिताचा असल्याचे तराळे यांनी निवेदनात म्हटले आहे.