शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:14 AM2021-06-22T04:14:04+5:302021-06-22T04:14:04+5:30
सावरा : आसेगाव बाजार मंडळातील शेतकऱ्यांना सन २०१९-२० या खरीप हंगामातील पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. गतमहिन्यामध्ये विमा कंपनीकडून पीकविम्याची ...
सावरा : आसेगाव बाजार मंडळातील शेतकऱ्यांना सन २०१९-२० या खरीप हंगामातील पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. गतमहिन्यामध्ये विमा कंपनीकडून पीकविम्याची रक्कम जाहीर करण्यात आली; मात्र सोयाबीन पिकाचा विमा आसेगाव मंडळातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. या मंडळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविम्याची मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार या मंडळात अतिपावसामुळे व अज्ञात व्हायरसमुळे सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन एकरी एक ते दोन क्विंटलचा उतारा लागला. तसेच गतवर्षी उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळेल, अशी आशा होती; मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. या सर्व प्रकारची चौकशी करून शेतकऱ्यांना सोयाबीन पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना १६ जून रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर डॉ. गजानन महल्ले, संदीप उगले, राजेश पाचडे व नितीन टोलमारे यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.