तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:25 AM2021-08-18T04:25:11+5:302021-08-18T04:25:11+5:30
तेल्हारा : तालुक्यात दि. २१, २२ व २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...
तेल्हारा : तालुक्यात दि. २१, २२ व २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत सर्वच महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यात जुलै महिन्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच नदीकाठच्या शेतात पाणी शिरून शेतजमीन खरडून गेली आहे. तालुक्यातील शेतकरी अडचणीत असताना तालुक्यातील एकूण सहा मंडलांपैकी एक मंडल माळेगाव बाजार पात्र ठरले व इतर पाच मंडलांना यामधून वगळण्यात आले आहे. वास्ताविक पाहता या सर्व मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निवेदनावर अरविंद गजानन अवताडे, गणेश दादाराव पाथ्रीकर, श्रीधर व्यंकटराव देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.