पातूर नगराध्यक्षांसह १३ सदस्यांना अपात्र करण्याची मागणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:33 AM2021-03-13T04:33:50+5:302021-03-13T04:33:50+5:30
पातूर नगरपालिका क्षेत्रातील पट्टे आमराई, बागायत व जिरायत पातूर ही तीन महसुली गावे कोणतीही हद्दवाढ झाली नसताना, पातूर नगरपालिकेने ...
पातूर नगरपालिका क्षेत्रातील पट्टे आमराई, बागायत व जिरायत पातूर ही तीन महसुली गावे कोणतीही हद्दवाढ झाली नसताना, पातूर नगरपालिकेने स्वयंघोषित हद्दवाढ करून नगरपालिका क्षेत्रात सामील करून घेतली होती. नगरपालिका निवडणुकीच्यावेळी शिर्ला हद्दीतील नागरिक पातूर नगर पालीका निवडणुकीमध्ये मतदान करीत असल्याची याचिका या अगोदरच दाखल करण्यात आली होती. परंतु उच्च न्यायायलाच्या एका आदेशानुसार बागायत पातूर, पट्टे आमराई पातूर व जिरायत पातूर तिनही गावे शिर्ला ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ट करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीनही गावातील नागरिकांची नावे पातूर नगरपालिका मतदार यादीतून वगळून शिर्ला गावाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. या भागातील नागरिकांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. एकाच भागात राहणारे दोन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य शासनाच्या व निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पात्र ठरत नाहीत. त्यामुळे ६ प्रभागाचे १३ नगरसेवकांसह नगराध्यक्षांना अपात्र घोषीत करण्याची मागणी पातूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विशेष प्रतिनिधी सै. ऐजाज हाजी सै. अय्युब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.