उड्डाणपुलाचे काम नेहरू पार्कपर्यंत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:16 AM2021-04-14T04:16:55+5:302021-04-14T04:16:55+5:30
अकोला : जुन्या राष्ट्रीय महामार्गावर शहर पोलीस उपअधीक्षक यांचे निवासस्थान ते नाईक हॉस्पिटलपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. ...
अकोला : जुन्या राष्ट्रीय महामार्गावर शहर पोलीस उपअधीक्षक यांचे निवासस्थान ते नाईक हॉस्पिटलपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. नाईक हॉस्पिटल परिसरातील नागरिकांना या बांधकामामुळे रस्त्याची अडचण होणार असल्याने या उड्डाणपुलाचे बांधकाम नेहरू पार्क चौकापर्यंत वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
अकोला : शिवनी बायपास ते रिधोरा या रोडवर सिमेंट रस्त्याचे काम करण्यात येत असून हे काम अन्नपूर्णा माता मंदिर परिसराजवळ निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने हे काम तातडीने चांगल्या दर्जाचे करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दहावी, बारावी परीक्षेची तारीख जाहीर करावी
अकोला : राज्य शासनाने दहावी व बारावीच्या परीक्षेच्या वेळा पुढे ढकलल्या असून त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने दहावी व बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याने विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत.
मास्कचा वापर कमी
अकोला : शहराच्या विविध पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारी घेऊन येत असलेल्या नागरिकांकडून मास्क वापरण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी अशी तक्रार करताना मास्क वाटपही सुरू केला आहे. नागरिकांनी मास्क वापरूनच पोलीस ठाण्यात प्रवेश करावा असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.
१७० पोलिसांना कोरोनाची लागण
अकोला : शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कोरोनायोद्धा पोलिसांना कोरोनाने घेरले आहे. जिल्ह्यातील सुमारे १७० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील एका पोलिसाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केले आहे.