इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या रोपांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 10:56 AM2021-05-06T10:56:20+5:302021-05-06T10:56:25+5:30
Tulsi, ashwagandha plants : गेल्या दोन महिन्यांत नागरिकांनी नर्सरी विक्रेत्यांकडे याविषयी विचारणा करून त्यांच्याकडून तुळस, अश्वगंधाच्या रोपांची मागणी केली आहे.
अकोला : कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हाच एकमेव उपाय असल्याचे समोर आले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानेही अनेक वनौषधींपासून तयार केलेल्या काढ्याचा नियमित वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर आयुर्वेदिक काढ्याचे सेवन नागरिक करू लागल्याने औषधी वनस्पतींचे महत्त्वही वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत नागरिकांनी नर्सरी विक्रेत्यांकडे याविषयी विचारणा करून त्यांच्याकडून तुळस, अश्वगंधाच्या रोपांची मागणी केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधी काढ्याचा उपयोग घरोघरी केला जात आहे. त्यामुळे घरच्या गच्चीतील बागेत गवती चहा, कृष्ण तुळस, गुळवेल, पानवेल या औषधी वनस्पतींचा बहर आला आहे. विविध रोपवाटिकांमध्ये सध्या फुलझाडांऐवजी औषधी वनस्पतींना मागणी वाढल्याचे नर्सरी चालकांचे म्हणणे आहे.
या दोन महिन्यात तुळस, अश्वगंधा यांसारख्या औषधी वनस्पतींना मागणी वाढली आहे. अश्वगंधासाठी नागरिकांकडून बुकिंग केले जात असून त्यांना त्यापद्धतीने रोपांचा पुरवठा केला जात आहे. कोरोना संक्रमण काळात औषधी वनस्पतींकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
- गणेश आगरकर, नर्सरी चालक
नर्सरीत तुळसची १०० च्या जवळपास रोपे उपलब्ध आहेत. नागरिकांकडून याची मागणीही होत आहे. त्याचबरोबर पालेभाज्यांच्या रोपांची मागणी वाढली आहे; परंतु संचारबंदी आणि काही नियमांमुळे सर्वापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही आहे.
- उमेश फुलारी, नर्सरी चालक
या पाच रोपांना वाढली मागणी
तुळस : तुळशीचा काढा सर्दी-खोकल्यावर रामबाण मानला जातो. तुळशीची काही पाने दूधात टाकून पिण्याने फायदा होतो. तुळशीत मोठ्या प्रमाणात ॲन्टी-बॅक्टेरियल आणि ॲन्टी-इन्फ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात.
अश्वगंधा : अश्वगंधाचे बरेच आरोग्यवर्धक फायदे आहेत. अश्वगंधाच्या सेवनाने पांढरे केस, डोळ्यांची दृष्टी सुधारणे, घशासंबंधित आजार, खोकला, छातीत दुखणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो; परंतु प्रत्येक रोगात अश्वगंधाचे सेवन करण्याचा मार्ग वेगळा आहे. अशा परिस्थितीत जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या व नंतरच त्याचे सेवन करावे.
पुदिना : ही वनस्पती शरीरास थंडावा देणारी असून, वायूहारक, पाचक व वातानुलोमन करणारी आहे. पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी, वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी, वातविकार इत्यादी याच्या सेवनाने बरे होतात.
अडुळसा : या वनस्पतीची पाने, फुले व फळे यांचा औषधात वापर होतो. अडुळसा उत्तेजक, कफहारक, कफ पातळ करणारा, खोकला कमी करणारा, दमा, श्वास इत्यादींवर उपयुक्त आहे. ग्रामीण भागात या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
गुळवेल : औषधामध्ये कडुनिंबाच्या झाडावर चढलेली गुळवेल महत्त्वाची समजली जाते. गुळवेलचा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयोग होतो. गुळवेल विशेषतः कावीळ रोगावर लाभदायी असून, त्वचारोग निवारणासाठीसुद्धा उपयोग होतो.