मूर्तिजापूर-सिरसो मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:58 AM2021-01-08T04:58:22+5:302021-01-08T04:58:22+5:30
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-दर्यापूर रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने या रस्त्यावर वाहनाची वर्दळ वाढली आहे. वाहने सुसाट वेगाने धावत ...
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-दर्यापूर रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने या रस्त्यावर वाहनाची वर्दळ वाढली आहे. वाहने सुसाट वेगाने धावत असल्याने मूर्तिजापूर-सिरसो दरम्यान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सिरसो फाटा, पुंडलिकनगर येथे रस्त्याचे रुंदीकरण करून गतिरोधक बसविण्याची मागणी सिरसो येथील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मूर्तिजापूर शहरापासून सिरसो व पुंडलिकनगर यामध्ये जवळपास तीन किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे सिरसो फाट्यापर्यंत वाहनांची, पादचाऱ्यांची दिवसभर वर्दळ असते. याच मार्गाने शाळा असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी असते. मूर्तिजापूर-दर्यापूर रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण झाल्याने रस्त्यावर सुसाट वेगाने वाहने धावतात. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. दर आठवड्याला दोन ते तीन अपघांत होत असल्याने चित्र आहे. त्यामुळे सिरसो व पुंडलिकनगर येथील रस्त्याचे रुंदीकरण करून गतिरोधक बसवावे, रस्त्यावर दर्शनी फलक बसवावा, अशी मागणी प्रवीण डाहाके यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.