स्टेशन विभागात नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:14 AM2021-07-08T04:14:11+5:302021-07-08T04:14:11+5:30
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मूर्तिजापूर शहरात अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम ...
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मूर्तिजापूर शहरात अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे. स्टेशन विभागातील अनेक घरात पाणी येत नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मुस्लीम कब्रस्तान जवळील असलेल्या पाण्याच्या टाकीपासून पीव्हीसी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून पीव्हीसी पाइपलाइनची समस्या वाढतच आहे. या पाइपलाइनद्वारे पाणी सोडल्यावर पाइपलाइन सातत्याने फुटते. त्यामुळे नेहमीच दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पीव्हीसी पाइपलाइन काढून नवीन मोठी लोखंडी जलवाहिनी टाकून या भागातील नागरिकांची तहान भागवावी. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन गायकवाड, काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष रोहित सोळंके, अभिजित अव्वलवार, दीपक खंडारे, सोहेल शेख, साजिद खान, मोहम्मद इरफान, शेख तोफिक मोहिन अली आदींनी केली आहे.
पीव्हीसी पाइपलाइनद्वारे या भागात होतो पाणीपुरवठा
वाल्मीकीनगर, मुबारकपूर, वडारपुरा या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. या भागातील लोकसंख्या वाढत आहे. याच पाइपलाइनवर अनेक नळाचे कनेक्शन जोडले आहेत. शासनाची व जनतेची दिशाभूल करून नगरपरिषद उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे. मात्र गोरगरिबांच्या प्रभागाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.