कृषी कर्जाचे वाटप त्वरित करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:24 AM2021-09-16T04:24:31+5:302021-09-16T04:24:31+5:30
आडगाव बु: खरीप हंगाम संपत आला, तरी परिसरातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाचे वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला ...
आडगाव बु: खरीप हंगाम संपत आला, तरी परिसरातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाचे वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेत शेतकरी संघटनेने कृषी कर्जाचे त्वरित वाटप करा, अशी मागणी करीत बँक शाखा अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकरी संघटनेने निवेदनातून दिला आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, सोयाबीन आदी पिकांची लागवड केली आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. पीक कर्ज घेऊन पेरणी करावी, अशी आशा असताना अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप झाले नाही. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केलेली आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची समस्या त्वरित सोडून खरीप हंगामातील पीक कर्जाचे वाटप करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने बँक शाखा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष नीलेश नेमाडे, ग्रामअध्यक्ष अमोल मसुरकार, गोपाल निमकर्डे, दिनेश गिऱ्हे, मंगेश रेळे, पंकज इंगळे, मकसूद मुल्लाजी, जाफर खा, अजित कळसकार, पिंटू भोपळे, नईमभाई, शेख इमरान, अजहर खा पठाण आदी उपस्थित होते.
------
....अन्यथा आंदोलन
शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे अन्यथा बेमुदत उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने निवेदनातून दिला आहे.
-------
येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांची समस्या निकाली काढण्यात येईल.
- आशिष मोरे, शाखाधिकारी सेंट्रल बँक, आडगाव.