डेमू रेल्वे अकोटपर्यंत सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:35+5:302021-09-23T04:21:35+5:30
अकोट : दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत अकोलापर्यंत सुरू असलेली डेमू रेल्वे अकोटपर्यंत त्वरित सुरू करावी, तसेच इतरही रेल्वे गाड्या अकोटपर्यंत ...
अकोट : दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत अकोलापर्यंत सुरू असलेली डेमू रेल्वे अकोटपर्यंत त्वरित सुरू करावी, तसेच इतरही रेल्वे गाड्या अकोटपर्यंत सुरू कराव्यात, अशी मागणी नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वे प्रबंधकांना सामाजिक कार्यकर्ते विजय जितकर यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. दक्षिण मध्य रेल्वे नांदेड मंडळाचे प्रबंधक उपिंदर सिंग यांनी दि.२२ सप्टेंबर रोजी अकोला रेल्वेस्थानकाला भेट दिली असता याप्रसंगी प्रबंधकांचे स्वीय सहायक रघुराम जी. यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
रेल्वे प्रबंधकांना दिलेल्या निवेदनानुसार, अकोला-खंडवा मीटर गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी चार वर्षांपासून रेल्वे मार्ग बंद आहे. अकोटपर्यंत गेज परिवर्तनाचे काम पूर्णत्वास आले आहे, तसेच अकोट येथे सुसज्ज रेल्वेस्थानकाचे निर्माणकार्य जवळपास पूर्ण झाले आहे. रेल्वेस्थानकाचे लोकार्पण करून रेल्वेचे आवागमन सुरू करावे, अकोला-पूर्णादरम्यान डेमू रेल्वे सुरू असून, ही गाडी अकोटपर्यंत सुरू करण्यात यावी, तसेच अकोट-औरंगाबाद-अकोट नवीन डेली इंटरसिटी एक्स्प्रेस व्हाया अकोला-वाशिम-हिंगोली-पूर्णा-परभणी-जालना सुरू करण्यात यावी, नांदेड-अकोट-नांदेड नवीन फास्ट पॅसेंजर व्हाया पूर्णा-अकोला सुरू करण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदनाच्या प्रती दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबादचे जनरल मॅनेजर, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार संजय धोत्रे यांना पाठविण्यात आल्या आहेत.