निकृष्ट दर्जाच्या मक्याचे वाटप थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:23+5:302021-04-01T04:19:23+5:30
अकोला : जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवरून नागरिकांना देण्यात येणारा मका हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामध्ये अळ्या व भुसा ...
अकोला : जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवरून नागरिकांना देण्यात येणारा मका हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामध्ये अळ्या व भुसा आढळत आहे. त्यामुळे खाण्यायोग्य नसलेला मका वाटप करणे त्वरित थांबवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली.
जिल्ह्यातील राशन दुकानांवरून गेल्या तीन ते चार दिवसांपासून राशनकार्ड धारकांना मक्याचे वाटप करण्यात येत आहे; मात्र हा मका अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये अळ्या व भुसा मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यामुळे नागरिकांची सुरू असलेली क्रूर थट्टा तत्काळ थांबवावी, निकृष्ट मक्याचे वाटप थांबवून खाण्यालायक चांगल्या दर्जाचे धान्य वाटावे, अन्यथा जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल. जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाने ठाण मांडल्याने मजूरवर्ग, कामगार व अल्पभूधारक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राशनचे धान्य हा हजारो कुटुंबीयांचाच जगण्याचा आधार आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे धान्य देऊन सुरू असलेली सर्वसामान्यांची अवहेलना थांबवावी अशी मागणी निवेदनात केली आहे.