लोकशाही आघाडीला सुरुंग!

By admin | Published: April 22, 2017 01:11 AM2017-04-22T01:11:28+5:302017-04-22T01:11:28+5:30

भारिप-बमसं घेणार काडीमोड; मनपातील राजकारणाला कलाटणी.

Democracy Frontier! | लोकशाही आघाडीला सुरुंग!

लोकशाही आघाडीला सुरुंग!

Next

अकोला : स्थायी समितीसह स्वीकृत सदस्य पदासाठी पक्षातील नगरसेवक, कार्यकर्त्यांची वर्णी लागावी, या उद्देशातून राष्ट्रवादी काँग्रेसने गठित केलेल्या लोकशाही आघाडीला भारिप-बहुजन महासंघाने सुरुंग लावला असून, लोकशाही आघाडीपासून काडीमोड घेण्याची पूर्ण तयारी भारिपने केल्याची माहिती आहे. भारिपचे तीन नगरसेवक आघाडीतून बाहेर पडल्यास स्वीकृत सदस्य पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍याच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
महापालिक ा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसचे पाच नगरसेवक स्वबळावर निवडून आले. स्थायी समिती तसेच स्वीकृत सदस्य पदावर पक्षातील कार्यकर्त्याची निवड व्हावी, यासाठी अपेक्षित संख्याबळ जुळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने भारिप-बमसंच्या तीन व एमआयएमच्या एका नगरसेवकाला सोबत घेऊन एकूण नऊ सदस्यांची लोकशाही आघाडी गठित केली. राकाँच्या गटनेतापदी शीतल गायकवाड यांची नियुक्ती केली. लोकशाही आघाडीचे संख्याबळ लक्षात घेता स्थायी समितीमध्ये दोन सदस्यांची निवड करण्यासाठी एक सदस्य राष्ट्रवादीचा व दुसरा एक सदस्य भारिपचा पाठविण्यावर दोन्ही पक्षात सहमती झाली होती. स्थायी समिती सदस्यांची निवड झाली, त्या दिवशी राकाँने सादर केलेल्या लिफाफ्यातून भारिपच्या अँड. धनश्री देव यांचे नाव वगळण्यात आले.
या प्रकारावर अँड. देव यांनी नाराजी व्यक्त करून आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट केले. या सर्व प्रकाराची माहिती पक्षाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांना दिल्यानंतर त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा आदेश दिल्याची माहिती आहे. त्या पृष्ठभूमीवर शुक्रवारी भारिप-बमसंच्या गटनेत्या अँड. धनश्री देव, नगरसेवक बबलू जगताप, नगरसेविका किरण बोराखडे यांच्या स्वाक्षरी घेण्यावर काथ्याकुट सुरू असल्याची माहिती आहे.

Web Title: Democracy Frontier!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.