‘पंदेकृवि’कडून प्रात्यक्षिकाद्वारे गंधक खत वापराबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:14 AM2021-06-05T04:14:36+5:302021-06-05T04:14:36+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनाखाली मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनाखाली मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश कडू यांनी हा उपक्रम हाती घेतला. कपाशी हे खारपाणपट्ट्यातील मुख्य पीक असून शेतकरी बऱ्याच वर्षांपासून हे पीक घेत आहे. शेतकऱ्यांकडून कपाशी या पिकाला नत्र, स्फुरद व पालाश या खतांचा प्रामुख्याने वापर केला जातो, परंतु दुय्यम अन्नद्रव्याकडे विशेष दुर्लक्ष होते. अखिल भारतीय समन्वयित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पाअंतर्गत अकोला जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केले असता गंधक या अन्न द्रव्याचा विशेष अभाव जमिनीमध्ये आढळून आला. याचे प्रमुख कारण म्हणजे गंधक विरहित रासायनिक खतांचा असंतुलित वापर तसेच सेंद्रिय खतांचा होत असलेला कमी वापर यामुळे गंधकाची कमतरता वाढत चालली असल्याचे संशोधनाअंती आढळले आहे. कपाशी या पिकांमध्ये प्रथिने व तेलाचे प्रमाण वाढविण्याकरिता गंधक या अन्नद्रव्याचे फार मोठे कार्य आहे; परंतु गंधकाच्या अभावामुळे कपाशी या पिकाच्या उत्पादनात घट झालेली आहे. जिल्ह्यातील दिनोडा या गावातील निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा केले असून या जमिनीतील मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळून एकूण ९ घटकांची तपासणी करून जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
तसेच खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांचे वर्ग घेऊन त्यांना विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाबद्दल अवगत केले जाणार आहे. शेतकऱ्यांची पेरणी वजा घाई लक्षात घेता विद्यापीठामार्फत दिनोडा येथील शेतकऱ्यांना एकरी १० किलो बेंतोनाईट गंधक प्रदान करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची निवड तसेच मातीचे नमुने गोळा करणे, प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे याबाबत तलाठी झनके तसेच दिनोडाचे सरपंच गीते यांचे विशेष सहकार्य लाभले. प्राध्यापक संदीप हाडोळे, प्रशांत सरप, सूरज लाखे व नांदुरकर हे कार्य करीत आहेत.