गावा-गावांत दाखविणार मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:06 PM2018-12-23T13:06:31+5:302018-12-23T13:06:39+5:30
अकोला : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या वापरासंदर्भात जनजागृतीसाठी जिल्ह्यातील गावा-गावांत २६ डिसेंबरपासून मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
अकोला : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या वापरासंदर्भात जनजागृतीसाठी जिल्ह्यातील गावा-गावांत २६ डिसेंबरपासून मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात अधिकारी व कर्मचाºयांची कार्यशाळा घेण्यात आली असून, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय स्तरावर प्रात्यक्षिकासाठी राखीव मतदान यंत्रांचे वितरण करण्यात आले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाºयांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी प्रामुख्याने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, नीलेश अपार, उदय राजपूत, अभय मोहिते, सर्व तहसीलदार व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसोबतच व्हीव्हीपॅटचा उपयोग केला जाणार आहे. त्यानुषंगाने या मतदान यंत्रांचा उपयोग आणि विश्वासार्हता संदर्भात जिल्ह्यात व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील गावा-गावांत २६ डिसेंबरपासून मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिकासाठी राखीव ‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट‘ची पाहणी करण्यात आली, तसेच गावा-गावांत प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय स्तरावरील प्रशिक्षण पथकातील संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना मतदान यंत्रांचे वितरण करण्यात आले.