अभ्यासक्रमाची गोडी वाढविण्यासाठी प्रात्यक्षिकांची गरज - महापौर विजय अग्रवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 02:22 PM2019-03-13T14:22:08+5:302019-03-13T14:22:19+5:30
लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी वाटावी, याकरिता प्रात्यक्षिक शिकविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर विजय अग्रवाल यांनी केले.
अकोला: येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा व स्पर्धेचा आहे. शालेय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी वाटावी, याकरिता प्रात्यक्षिक शिकविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर विजय अग्रवाल यांनी केले. मनपाच्या मुख्य सभागृहात रोबोटिक कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, महिला व बालविकास सभापती सारिका जयस्वाल, माजी महापौर सुमन गावंडे व चंदा ठाकूर उपस्थित होत्या. महापालिकेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढावा, या उद्देशातून महिला व बालकल्याण विभागामार्फत मुख्य सभागृहात मनपा शाळेतील सर्व माध्यमांच्या शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय रोबोटिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर विजय अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी महापौर अग्रवाल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून कार्यशाळेत शिकविण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांची माहिती घेतली. त्यावेळी कार्यशाळेत तयार करण्यात आलेल्या विविध प्रकारचे प्रोजेक्ट पाहून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यावेळी रोबोटिक कार्यशाळा घेणाऱ्या संचालिका काजल राजवैद्य, विजय भट्टड, ऋषभ राजवैद्य, अर्जुन देवरनकर यांचे आभार मानले तसेच त्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार महिला व बालकल्याण अधिकारी नंदिनी दामोदर यांनी मानले.