जीएमसीत अस्थायी सहायक प्राध्यापकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 10:55 AM2020-10-16T10:55:59+5:302020-10-16T10:58:01+5:30
Akola Gmc अस्थायी सहायक प्राध्यापकांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहायक प्राध्यापकांच्या सेवा नियमित कराव्या, या मागणीसाठी गुरुवारी अस्थायी सहायक प्राध्यापकांनी प्रशासकीय कार्यालयासमोर निदर्शने दिली. मागण्या मान्य न झाल्यास १ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा इशारा यावेळी डॉक्टरांनी दिला आहे. राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील चार ते पाच वर्षांपासून १२०/३६४ दिवस अस्थायी सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या प्राध्यापकांनी कोविड वार्डातही नियमित सेवा दिली आहे. यासोबतच प्रशासकीय कामकाजासह वैद्यकीय शिक्षणाचीही जबाबदारी ते पार पाडत आहेत. असे असतानाही अस्थायी सहायक प्राध्यापकांना सेवा नियमित करण्यासंदर्भात केवळ आश्वासन दिले जातात; मात्र अद्यापही त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत अस्थायी सहायक प्राध्यापकांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या दोन दिवसीय आंदोलनाची सुरुवात गुरुवारपासून राज्यभरात करण्यात आली. दरम्यान, प्राध्यापकांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांना जीएमसी अधिष्ठाता यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. राज्यातील परिस्थिती आणि रुग्णहित लक्षात घेता डॉक्टरांनी १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी प्रतीकात्मक आंदोलन म्हणून काळ्या फिती लावून काम करीत आहोत. या नंतरही मागणीचा विचार न केल्यास १ नोव्हेंबरपासून राज्यभर कामबंद आंदोलन करू, असा इशाराही आंदोलनकांनी दिला आहे. निवेदनावर डाॅ. श्रीनिवास चित्ता, डाॅ. माधुरी ढाकणे, डाॅ. पराग डोईफोडे, डाॅ. पंकज बदरखे, डाॅ. सागर फाटे, डाॅ. सुगत कावळे, डाॅ. अनुप गोसावी, डाॅ. शिल्पा कासट-चितलांगे, डाॅ. महेश पुरी, डाॅ. पूजा शाह, डाॅ. सालेहा खान, डाॅ. महेशचंद्र चापे, डाॅ. वीरेंद्र मोदी, डाॅ. दीपिका राठी- हेडा, डाॅ. अंकुश अजमेरा, डाॅ. रीषभ बिलाला, डाॅ. सनी वाधवानी आदींच्या स्वाक्षरी आहेत. डाॅ. महेश पुरी, डाॅ. सुष्मा देशमुख, डाॅ. अनुप गोसावी यांचीही यावेळी उपस्थिती होती.
काळ्या फिती लावून केला निषेध
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत अस्थायी सहायक प्राध्यापकांनी प्रलंबित मागण्यांसाठी काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग घेतला.