डेमोसाईल क्रेन पक्ष्याचे अकोल्यात आगमन
By admin | Published: January 29, 2015 01:12 AM2015-01-29T01:12:50+5:302015-01-29T01:12:50+5:30
पक्षीमित्रांना स्थलातंरीत पक्षी निरीक्षणाची अपुर्व संधी.
अकोला- जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यांचे मोठय़ाप्रमाणावर आगमन होत आहे. यात डेमोसाईल क्रेन पक्ष्याचाही समावेश आहे. हा पक्षी दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस जिल्ह्यात येतो. गत दोन वर्षांपासून मात्र या पक्ष्याचे अकोला जिल्ह्यात दर्शन झाले नव्हते. यावर्षी मोठय़ाप्रमाणावर डेमोसाईल क्रेनचे जिल्ह्यात आगमन झाले असल्याचे मंगळवारी पक्षीमित्रांना पक्षी निरीक्षणादरम्यान आढळून आले.
अकोला जिल्ह्यात दरवर्षी युरोप आणि अन्य प्रदेशातून स्थलांतरित पक्षी मोठय़ाप्रमाणावर येतात. यात प्रामुख्याने डेमोसाईल क्रेन या पक्ष्याचा समावेश आहे. या पक्ष्याचे अकोला जिल्ह्यात मोठय़ाप्रमाणावर आगमन होते. गत दोन वर्षांंत मात्र पक्षी निरीक्षकांना जिल्ह्यात हा पक्षी आढळून आला नव्हता. डेमोसाईल क्रेन पक्ष्याने ग्लोबल वार्मिंंगमुळे स्थलांतराचा काळ बदला आणि स्थळही बदल्याचे बोलले जात होते. दोन वर्षांंच्या खंडानंतर यावर्षी मात्र हा पक्षी जिल्ह्यात मोठय़ाप्रमाणावर आढळून आला आहे. पक्षीनिरीक्षक लक्ष्मीशंकर यादव आणि प्रा. मनीष शेटे यांनी मंगळवारी कापशी, महान आणि सिसा मासा परिसरात केलेल्या पक्षीनिरीक्षणादरम्यान त्यांना डेमोसाईल क्रेन पक्षी मोठय़ाप्रमाणावर आढळून आलेत. हा पक्षी ८५ ते १00 सेंटीमीटर लांबीचा असून, रंग पांढरा आणि तोंड काळे असते. स्थलांतर काळात २६ हजार फूट उंचीवरून उड्डाण करतो. या पक्ष्याचे भारतात खैबर खिंडी मार्गे आगमन होते. या पक्ष्याचा उल्लेख रामायणातही आढळून येतो. हा पक्षी शेती आणि मोठय़ा तलावांजवळ आढळून येतो. या पक्ष्याचे वास्तव युरोप खंड, रशिया व पूर्व आफ्रिकेत आढळून येत असल्याची माहिती यादव व शेटे यांनी दिली.