अकोटपर्यंत डेमू : १५ ऑगस्टचा मुहूर्त टळला, आता प्रतीक्षा गणेश चतुर्थीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:25 AM2021-08-17T04:25:06+5:302021-08-17T04:25:06+5:30
अकोला : पूर्णा ते अकोला डेमू पॅसेंजर गाडीचा पल्ला अकोटपर्यंत वाढविण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या अकोट तालुक्यातील जनतेच्या पदरी निराशाच ...
अकोला : पूर्णा ते अकोला डेमू पॅसेंजर गाडीचा पल्ला अकोटपर्यंत वाढविण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या अकोट तालुक्यातील जनतेच्या पदरी निराशाच पडत असून, ही गाडी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्ताला अकोटपर्यंत सुरू होण्याची शक्यता मावळली आहे. अकोटकरांना आता किमान १० सप्टेंबर अर्थात गणेश चतुर्थीला तरी डेमू गाडी सुरू व्हावी, अशी अपेक्षा असून, त्या दिशेने त्यांनी आंदोलनाची तयारी चालविली असल्याची माहिती आहे.
दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड ते अकोला व पुढे अकोटपर्यंत मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले आहे. १९ जुलैपासून पूर्णा ते अकोला अशी डेमू गाडीही या मार्गाने सुरू झाली आहे. अकोट ते खंडवापर्यंतचे गेजपरिवर्तन रखडल्याने अकोटपर्यंत तरी रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी अकोट तालुक्यातील विविध संस्था, संघटना व राजकीय मंडळींनी लावून धरली आहे. या जनरेट्यामुळे हीच गाडी अकोटपर्यंत नेण्याचा प्रस्ताव मध्यंतरी आला होता व तसे शेड्यूलही तयार करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे ही गाडी अकोटपर्यंत आणावी अशी मागणी अकोट तालुक्यातील १५ संघटनांनी नांदेड मंडळाच्या प्रबंधकांना १० ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे केली; परंतु त्या दिशेने कोणतीही हालचाल न झाल्याने १५ ऑगस्टचा मुहूर्त आता टळला आहे.
डेमू अकोल्यात चार तास राहते उभी
१९ जुलैपासून सुरू झालेली ०७७७३ ही विशेष डेमू गाडी पूर्णा येथून सकाळी सात वाजता निघून दुपारी १२ वाजता अकोल्यात पोहोचते. त्यानंतर दुपारी चार वाजता ०७७७४ क्रमांकाची ही गाडी पूर्णाकरिता रवाना होते. अकोला स्थानकावर तब्बल चार तास उभी राहणारी ही गाडी अकोटपर्यंत धावल्यास वेळेचा सदुपयोग होऊन अकोट शहरासह परिसरातील प्रवाशांना याचा लाभ होईल, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
खासदारांच्या अकोला आगमनाची प्रतीक्षा
माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे हे सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्ली येथे आहेत. ते अकोल्यात परतल्यानंतर डेमू गाडी अकोटपर्यंत आणण्याकरिता काय करता येईल, याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष झुनझुनवाला यांनी सांगितले.
१५ ऑगस्टपर्यंत डेमू अकोटपर्यंत सुरू करावी, यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले; परंतु ही आशा मावळली आहे. रेल्वेने किमान तारीख तरी निश्चित करावी. गणेश चतुर्थीपर्यंत डेमू सुरू झाली नाही तर आम्हाला आंदोलनाची तयारी करावी लागेल.
- विजय जितकर, रेल्वे कार्यकर्ता, अकोट