डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले ‘पॉझिटिव्ह’
By admin | Published: September 19, 2016 02:49 AM2016-09-19T02:49:57+5:302016-09-19T02:49:57+5:30
अकोला शहरासह जिल्हय़ात डेंग्यूसदृश आजार व मलेरियाने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली.
अकोला, दि. १८ : वातावरणातील बदल, पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या गटारांची स्वच्छता न होणे, तसेच घाणीचे साम्राज्य यामुळे जिल्हय़ात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरासह जिल्हय़ात डेंग्यूसदृश आजार व मलेरियाने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असली, तरी आरोग्य विभाग या आजारांवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. यावर्षी संपूर्ण जिल्हय़ात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भरपूर पाऊस झाल्याने शहर तसेच गाव, खेड्यांमध्ये ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत. तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्यही पसरले आहे. त्यामुळे आपसुकच डासांची पैदास मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. स्वच्छ पाण्यात ह्यएडीस एजिप्टायह्ण या मच्छरांची पैदास वाढल्याने डेंग्यूचा धोका वाढला आहे. गत दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा आला आहे. त्यामुळे सर्दी, पडसे, मलेरिया व डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्हय़ात मलेरियाचे १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर या महिन्यात मलेरिया विभागाकडून ४५ हजार ९२६ लोकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. आगामी दिवसांमध्ये वातावरण असेच राहिले, तर जिल्हय़ात मलेरियासह अन्य आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.