अकोला जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनियाचा पुन्हा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:12 PM2019-11-02T12:12:51+5:302019-11-02T12:13:02+5:30
गत महिनाभरात जिल्ह्यात डेंग्युचे सहा, तर चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : परतीच्या पावसामुळे वातावरणात बदल झाला असून, त्याचा फटका आरोग्याला बसत आहे. शहरातील अनेक भागात डबके साचल्याने डेंग्यू, चिकुनगुनियाचा धोका पुन्हा वाढला आहे. गत महिनाभरात जिल्ह्यात डेंग्युचे सहा, तर चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळले आहे. डेंग्यू, चिकुनगुनियाचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
सध्या राज्यभरात डेंग्यू, चिकुनगुनियाने थैमान घातले आहे. अकोला जिल्ह्यातही डेंग्यू, चिकुनगुनियासदृश तापाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शिवाय, वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्यासह तापाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसोबतच खासगी दवाखाने हाउसफुल झाली आहेत. जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे सहा, तर चिकुनगुनियाचे चार रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषत: डेंग्यूपासून बचावासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्यापर्यंत डेंग्यूच्या प्रसाराचा धोका संभवत असल्याने जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे १५ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत कंटेनर सर्व्हेची विशेष मोहीम राबविण्यात आली. परतीचा पाऊस लांबल्याने मोहिमेचा कालावधी दोन आठवडे वाढविण्यात आला आहे.
कंटेनर सर्व्हे आणखी १५ दिवस
परतीचा पाऊस लांबल्याने जिल्हा हिवताप विभागातर्फे कंटेनर सर्व्हेचा कालावधी आणखी १५ दिवस वाढविण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात यापूर्वी ज्या ज्या भागात डेंग्यू सदृश रुग्ण आढळले, अशा ठिकाणी घरोघरी जाऊन पाणी साठविण्याच्या भांड्यांची पाहणी केली जाणार आहे, तसेच परिसरातील स्वच्छतेचीही पाहणी केली जाईल.
जिल्ह्यात कंटेनर सर्व्हेच्या मोहिमेचा कालावधीही वाढविला आहे. नोव्हेंबर महिन्यातील दोन आठवडे जिल्ह्यातील डेंग्यूसदृश भागात सर्व्हे करण्यात येणार आहे; मात्र नागरिकांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या.
- डॉ. विवेक पेंढारकर, जिल्हा हिवताप अधिकारी.