अकोला शहरात वाढतेयं डेंग्यूसदृश आजाराची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 10:51 AM2020-08-26T10:51:51+5:302020-08-26T10:52:09+5:30
संभाव्य परिस्थिती लक्षात घेता प्रभागांमध्ये धुरळणी (फॉगिंग)ला खो देत मनपाचा हिवताप विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे.
अकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूची साथ, त्यात भरीसभर शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी व त्यात निर्माण झालेल्या डासांच्या उत्पत्तीमुळे शहरात डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरल्याचे समोर आले आहे. शहरातील पानथळ भागात साचणाºया पाण्याची विल्हेवाट लावल्या जात नसल्याने आगामी दिवसांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता प्रभागांमध्ये धुरळणी (फॉगिंग)ला खो देत मनपाचा हिवताप विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे.
मागील चार वर्षांपासून अकोलेकरांना डेंग्यूसदृश आजाराने हैराण करून सोडले आहे. पावसाळा सुरू होताच डेंग्यू, मलेरियाच्या आजारात वाढ होत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. घरातील फ्रिज, कूलर, शोभिवंत फुलांची कुंडी, पाण्याची टाकी तसेच अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. एडिस एजिप्ताय या डासाने चावा घेतल्यास डेंग्यूचा फैलाव होतो. डेंग्यू किंवा मलेरिया झालेले अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल न होता खासगी रुग्णालयात दाखल होतात. शहरातील काही खासगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. आगामी दिवसांत अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहिती आहे. जीवघेण्या डेंग्यूचा धोका ओळखून महापालिकेच्या मलेरिया विभागासह वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना राबवणे अपेक्षित असताना संबंधित विभाग कमालीचे निष्क्रिय ठरत असल्याचे दिसून येत आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी प्रभागांमध्ये तसेच घरा-घरांमध्ये धुरळणी करणे व साचलेल्या पाण्यांमध्ये औषध फवारणी करून पाणी वाहते करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभावी मोहीम राबवण्याची गरज असताना हिवताप विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे.
रुग्ण डेंग्यूसदृश असला तरीही...
डेंग्यूची लक्षणे आढळणाºया रुग्णांची दोन प्रकारे चाचणी केली जाते. ‘रॅपिड’चाचणीचे तीन प्रकार असून, तीनपैकी कोणतीही चाचणी ‘पॉझिटिव्ह’आल्यास तो रुग्ण डेंग्यूसदृश समजल्या जातो, तसेच ‘एलेन्झा’चाचणी केली असेल तर त्या रुग्णाला डेंग्यू झाल्याचे निश्चीत मानल्या जाते. ‘रॅपिड’चाचणीद्वारे डेंग्यूसदृश रुग्ण आढळला तरीही त्याच्यावर मात्र डेंग्यूच्या रुग्णाप्रमाणेच उपचार केले जातात, हे येथे उल्लेखनीय.
मनपाला माहिती देणे बंधनकारक
खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाºया डेंग्यूच्या रुग्णांची प्रशासनाकडे नोंद करणे बंधनकारक आहे. पालिकेच्या मलेरिया विभाग व आरोग्य विभागाने अद्यापही याबाबत जनजागृतीला सुरुवातच केली नसल्याचे दिसत आहे.
या मुद्यावर हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांचे दैनंदिन वेळापत्रक तपासल्या जाईल. कामात कुचराई खपवून घेतली जाणार नाही. प्रभागात नियमित फवारणी होत नसेल तर नगरसेवकांनी सूचना द्यावी.
-पुनम कळंबे, उपायुक्त मनपा.
प्रभागातील रस्तेच नव्हे तर सर्व्हिस लाईनमध्ये फॉगिंग केल्यास डासांपासून होणाऱ्या संभाव्य साथ रोगांना आळा घालता येईल. हिवताप विभाग कुचकामी ठरला असून, त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.
-शीतल गायकवाड, गटनेता, राष्ट्रवादी