अकोला शहरावर डेंग्यूचे सावट ; तीन संशयीत रुग्ण आढळले!
By atul.jaiswal | Published: July 7, 2018 01:39 PM2018-07-07T13:39:38+5:302018-07-07T13:46:57+5:30
अकोला : पावसाळा सुरू होताच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, कीटकजन्य आजारांनी डोके वर काढले आहे.
अकोला : पावसाळा सुरू होताच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, कीटकजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या कंटेनर सर्वेक्षणात पहिल्या पाच दिवसांतच शहरातील ९० टक्के कूलरच्या पाण्यामध्ये डेंग्यू या जीवघेण्या आजारास कारणीभूत असलेल्या एडिस एजिप्टा डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत, तसेच डेंग्यूसदृश आजाराचे तीन संशयीत रुग्णही आढळून आल्याने शहरावर डेंग्यूचे सावट असल्याचे संकेत मिळाले आहेत.
नागरी हिवताप योजनेंतर्गत संपूर्ण जुलै महिना डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत मनपाच्या आरोग्य विभागाने ३० जूनपासूनच शहरातील विविध भागांमध्ये कंटेनर सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी पाच पर्यवेक्षकांना कामाला लावले असून, त्यांच्या मदतीला मनपाचे आरोग्य कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी आळशी प्लॉट, राजपूतपुरा, शिक्षक कॉलनी, मलकापूर, व्हीएचबी कॉलनी, शिवाजी नगर, इंदिरा नगर, अकोट फैल, नायगाव आदी भागांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात ९० टक्के कूलरच्या पाण्यामध्ये एडिस एजिप्टा या डेंग्यूसाठी कारणीभूत असलेल्या डासांच्या अळ्या आढळून आल्या, तसेच या सर्वेक्षणादरम्यान गुलजारपुरा भागात डेंग्यूसदृश आजाराचे दोन तर नायगाव परिसरात १ असे एकूण तीन रुग्ण आढळून आले. या रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले असून, या परिसरात फॉगिंग मशीनद्वारे धुरळणी करण्यात आली आहे.
अशी होते डेंग्यूची लागण
स्वच्छ, साचलेल्या पाण्यात अंडी घालणारा एडीस एजिप्टा हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो. हे डास शक्यतो सकाळी व संध्याकाळी चावतात. पावसाळ्यानंतर तापमानात होत असलेल्या चढ-उतारांमध्ये डेंग्यूच्या विषाणूंची संख्या वाढते आणि त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढते. डासांनी वहन करून आणलेल्या विषाणूंशी लढण्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडली की, डेंग्यूची लागण होते.
लक्षणे
तीव्र स्वरुपाचा ताप, तीव्र डोकेदुखी, सांधे दुखी, अंग दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, रक्तमिश्रीत शौचास होणे, रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे आदी लक्षणे आढळून येतात.
साठलेले पाणी वाहते करा!
घरात पाण्याचा साठा केल्यास या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाणी साचून त्यात हे डास वाढतात. कूलरच्या पाण्यातही हे डास वाढू शकतात. घर व परिसरात डास होणार नाहीत, याची काळजी घेतल्यास डेंग्यू व मलेरिया या आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून डासांच्या उत्पत्तीला अटकाव करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सर्वेक्षणादरम्यान कूलरच्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. साठलेले पाणी हे डेंग्यूच्या डासाचे मुख्य उत्पत्तीस्थळ आहे. त्यामुळे साठलेले पाणी वाहते करणे गरजेचे आहे. कूलरच्या पाण्यात मोटारसायकलचे आॅईल टाकल्यास आॅक्सिजन न मिळाल्याने डासांच्या अळ्यांचा नायनाट होतो.
- डॉ. फारुख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, अकोला.