डेंग्यू, हिवतापसदृश तापाने अकोलेकर त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 04:13 PM2019-08-12T16:13:10+5:302019-08-12T16:13:15+5:30
गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी डबके साचले असून, डासांची उत्पत्ती वाढली आहे.
अकोला : जिल्ह्यात डेंग्यू, हिवतापसदृश तापाने नागरिक त्रस्त झाले असून, सर्दी, खोकला अन् डोकेदुखीच्या समस्येनेही अनेकांची झोप उडविली आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली असून, नागरिकांनी बचावात्मक उपाययोजना कराव्या, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.
गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी डबके साचले असून, डासांची उत्पत्ती वाढली आहे. शिवाय, जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने या भागात दूषित पाणी पिण्यात आले. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील नागरिकांवर झाला असून, डेंग्यू, हिवतापसदृश तापाने अनेकांना ग्रासले आहे. यामध्ये बहुतांश रुग्णांना सर्दी, खोकला आणि डोकेदुखीच्याही समस्या सतावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी साथीच्या आजारांना कारणीभूत डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावी, तसेच घरात व परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
दवाखाने हाउसफुल्ल
साथीच्या आजारामुळे नागरिक त्रस्त असून, जिल्ह्यातील लहान-मोठे दवाखाने हाउसफुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढल्याचेही दिसून येत आहे.
शासकीय रुग्णालये देताहेत आजारांना निमंत्रण
सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात अस्वच्छता असल्याचे दिसून येते. हा प्रकार रुग्णांसाठी घातक असून, विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे.
परिसर स्वच्छ ठेवा!
नागरिकांनी स्वत:च्या घरासोबतच परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. शिवाय, डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी साठविण्याची भांडी कोरडी ठेवून ती कोरड्या फडक्याने पुसून घ्यावी, जेणेकरून भांड्याच्या कडांना चिटकलेली डासांची अंडी नष्ट होतील.