कोरोनानंतर डेंग्यूचा कहर; कार्ला येथे १८ जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 10:49 AM2020-04-19T10:49:49+5:302020-04-19T10:50:13+5:30
आतापर्यंत १८ ग्रामस्थांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कार्ला (अकोला) : दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या कार्ला बु. या गावात गत १० ते १२ दिवसांपासून डेंग्यू या आजाराने थैमान घातले असून, आतापर्यंत १८ ग्रामस्थांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले आहे. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावात स्वच्छता अभियानासह उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, दोघांना डेग्यू झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे, गावात भितीचे वातावरण आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य विभाग व्यस्त असतानाच कार्ला येथे डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. गावातील १८ जणांना आजाराची लागण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. कार्ला गावातील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य आहे. दरम्यान, दोन ग्रामस्थांना डेंग्यू झाल्याचे निदान झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दानापूर प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. भीमकर यांनी गत १५ दिवसांत दोन वेळा गावात भेट देऊन तपासणी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनानेही याकडे लक्ष देऊन गावात स्वच्छता ठेवण्याची गरज आहे.
कार्ला गाव सौंदळा आरोग्य उपकेंद्रांतर्गत येते. सौंदळा आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने दानापूर प्रा. आ. केंद्रामार्फत आतापर्यंत चार वेळा भेट देऊन पाहणी केली व रक्त नमुनेसुद्धा घेतले आहेत.
- डॉ. एस. एम. भीमकर, वैद्यकीय अधिकारी, दानापूर.