चिमुकल्यांमध्ये वाढतेय डेंग्यूची फणफण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 10:44 AM2021-07-05T10:44:08+5:302021-07-05T10:47:56+5:30
Dengue is on the rise in childrens : जिल्हाभरातून येणारे डेंग्यूसदृश रुग्ण शहरातील विविध खासगी रुग्णालयांत दाखल होत आहेत.
अकोला : कोविडनंतर आता जिल्हाभरातून येणारे डेंग्यूसदृश रुग्ण शहरातील विविध खासगी रुग्णालयांत दाखल होत आहेत. यातील बहुतांश रुग्ण बाहेरील जिल्ह्यांतील असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
पावसाळ्याला सुरुवात झाल्याने अकोल्यासह लगतच्या जिल्ह्यांमध्ये डेंग्यूसदृश आजार डोके वर काढत आहेत. प्रामुख्याने अकोला येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. खासगी रुग्णालयांत डेग्यूसदृश बालक दाखल असल्याची माहिती डाॅक्टरांकडून देण्यात येते. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वच्छता करावी व डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांपासून लांब राहावे, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
या करा उपाययोजना...
- आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीत.
- पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पध्दतीने व्यवस्थित झाकून ठेवावे.
- घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी.
- घरांच्या भोवताली व छतावर वापरात नसणारे टाकाऊ साहित्य ठेवू नये.