आकृतीबंधाच्या अहवालासाठी विभागप्रमुखांची दमछाक
By admin | Published: October 13, 2016 03:09 AM2016-10-13T03:09:12+5:302016-10-13T03:09:12+5:30
मनपा आयुक्तांकडे इत्थंभूत माहिती सादर करताना नाकीनऊ.
अकोला, दि. १२- महापालिका कर्मचार्यांसाठी सुधारित आकृतीबंध तयार करताना विभागप्रमुखांची चांगलीच दमछाक होत आहे. मनपा आयुक्त अजय लहाने यांच्याकडे इत्थंभूत माहिती सादर करतेवेळी कर्मचार्यांची नेमकी संख्या व आस्थापनेचा ताळमेळ साधणे विभागप्रमुखांसाठी अग्निपरीक्षा ठरू लागली आहे. महिनाभराच्या कालावधीत केवळ चार विभागांची माहिती आयुक्तांकडे देण्यात आल्याची माहिती आहे.
महापालिका प्रशासनाने २00४ पासून बिंदू नामावली अद्ययावत करण्याकडे दुर्लक्ष केले. ऑगस्ट २0१५ मध्ये अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस. थूल यांनी प्रशासनाला बिंदूनामावली अद्ययावत करण्याचे निर्देश दिले होते. बिंदू नामावली अद्ययावत करण्यासाठी अजय लहाने यांनी पुढाकार घेतला. अकरा वर्षांपासून बिंदू नामावलीचा विषय जाणीवपूर्वक थंड बस्त्यात ठेवल्याने तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांसह विविध पदांचा अनुशेष निर्माण झाला आहे. त्यामुळे जलप्रदाय विभाग, बांधकाम विभाग, नगर रचना विभागाच्या माध्यमातून होणारी कामे प्रभावित झाली. मनपाच्या तत्कालीन आयुक्तांसह मुख्य लेखा परीक्षकांनी नियमबाह्यरीत्या पदोन्नती प्रक्रिया राबवली होती. नियमबाह्य पदोन्नतीद्वारे अनेक कर्मचार्यांनी महत्त्वाच्या पदांवर ताबा मिळवल्याने पदोन्नतीसाठी पात्र कर्मचार्यांवर अन्याय झाला. प्रशासनाची विस्कटलेली घडी मार्गी लावण्यासाठी आयुक्त लहाने यांनी कर्मचार्यांसाठी सुधारित आकृतीबंध तयार करण्याचा निर्णय घेऊन विभागप्रमुखांना अहवाल सादर करण्याच्या सांगितले. मात्र आजपर्यंत केवळ चार विभागांची माहिती आयुक्तांकडे उपलब्ध झाली आहे.
तत्कालीन ग्रा.पं.मधील कर्मचार्यांना सामावणार
शहराची हद्दवाढ झाल्यामुळे १५ ग्रामपंचायतींमधील आस्थापनेवरील कर्मचार्यांना मनपाच्या आस्थापना सेवेत सामावून घेतल्या जाणार आहे. यामध्ये आस्थापनेसह मानधनावरील ११२ कर्मचार्यांचा समावेश आहे. त्यानुषंगाने आस्थापनेवरील कर्मचार्यांच्या सेवापुस्तिका तपासण्याचे निर्देश आयुक्तांनी दिल्याची माहिती आहे.
सूचना केल्या तरीही..
आकृतीबंध तयार करताना त्यामध्ये सुटसुटीतपणा व एकसूत्रीपणा असावा, यासाठी विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागात कार्यरत कर्मचार्यांची संख्या, सेवानवृत्त कर्मचार्यांची संख्या, रिक्त पदांचा अनुशेष, कर्मचार्यांची वेतनश्रेणी, कामाचे मूल्यमापन आदी सर्व बाबींचा अंतर्भाव करून माहिती सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली. तरीही विभागप्रमुखांचा कर्मचार्यांची माहिती सादर करताना गोंधळ उडत असल्याची माहिती आहे.